वृत्तसंस्था/ कौलालंपूर
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मलेशिया मास्टर्स सुपर 500 पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी भारतीय बॅडमिंटनपटू सज्ज झाले आहेत.
अलिकडेच झालेल्या सुदीरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंकडून साफ निराशा झाली आहे. चीनमध्ये झालेल्या सुदीरमन चषक विश्व मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत गेल्या आठवड्यात भारताच्या सहाव्या मानांकित पी. व्ही. सिंधूला टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या थायलंडच्या तेई यांग आणि वेई यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय बॅडमिंटनपटूना चीनमधील झालेल्या स्पर्धेत एकेरीच्या सामन्यात चीन तैपेई आणि मलेशियाच्या बॅडमिंटनपटूकडून हार पत्करावी लागल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. तसेच भारताच्या दुहेरीतील बॅडमिंटनपटूंनाही चीन तैपेई आणि मलेशियाच्या स्पर्धकांकडून अनुक्रमे 1-4 आणि 0-5 अशी हार पत्करावी लागली होती. पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी भारतीय बॅडमिंटनपटूना विश्व बॅडमिंटन टूरवरील आगामी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.
मलेशिया मास्टर्स बॅडमिंनट स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूचा एकेरीतील सलामीचा सामना डेन्मार्कच्या लिने ख्रिस्टोफर्सनशी तसेच पुरुष एकेरीत भारताच्या एच. एस. प्रणॉयचा सलामीचा सामना सहाव्या मानांकित चीन तैपेईच्या चेनशी होणार आहे. किदांबी श्रीकांतचा पुरुष एकेरीतील सलामीचा सामना जपानच्या कांता सुनेयामाशी होईल. चीनमध्ये झालेल्या सुदीरमन चषक मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये लक्ष्य सेनचा राखीव खेळाडुंच्या यादीत समावेश करण्यात आल्याने त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण मलेशिया मास्टर्स स्पर्धेत एकेरीत त्याचा सलामीच्या सामना सिंगापूरच्या माजी विश्व विजेत्या लोह येव्हशी होणार आहे. दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. मालविका बनसूद, आकर्षी काश्यप, बी. साईप्रनीत, मिथून मंजुनाथ आणि पी. राजवत यांचाही भारतीय संघात समावेश आहे.









