
वार्ताहर /किणये
ग्रामीण काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा अतिवाड गावात झंझावाती प्रचार करण्यात आला. टाळ-मृदंगाच्या गजरात व शेकडो महिलांच्या उपस्थितीत प्रचार मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांना भरघोस पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. प्रारंभी काँग्रेसच्या प्रमुख नेतेमंडळी व महिलांच्या हस्ते लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्वागत केले. यानंतर गावभर प्रचार केला. हेब्बाळकर यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपल्याला यावेळेलाही भरघोस मतांनी निवडून आणा. मी तुमच्या भागाचा विकास करण्यास कटिबद्ध राहीन, असे सांगितले. प्रचार फेरीत महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.
सावगाव, बेनकनहळ्ळी गावातही केला प्रचार
बेळगाव ग्रामीण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांना काळेनट्टी गावातून संपूर्ण पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. हेब्बाळकर यांना निवडून आणण्याचा निर्धार गावातील महिला व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. काळेनट्टी गावात हेब्बाळकर यांनी विविध योजना राबवून गावचा विकास केला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पुन्हा एकदा निवडून आणून विधानसभेत पाठविणार आहे, असे मनोगत त्यांच्या प्रचारसभेत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. विकास हेच आपले ध्येय असून ग्रामीण जनतेची यापुढेही मी प्रामाणिकपणे सेवा करणार. त्यासाठी मला पुन्हा भरघोस मतांनी निवडून द्या, असे हेब्बाळकर यांनी आपल्या प्रचारसभेत आवाहन केले. तसेच महिलांसाठी विविध योजना आम्ही उपलब्ध करून देणार आहोत, असे हेब्बाळकर यांनी सांगितले. लक्ष्मी हेब्बाळकर यांची रविवारी सावगाव, बेनकनहळळी गावात प्रचारफेरी काढण्यात आली. या दोन्ही गावातूनही हेब्बाळकर यांना काँग्रेसच्या समर्थकांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.









