मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे आवाहन : बिडी येथे भाजपची भव्य प्रचार रॅली, भाजपच्या विजयासाठी मतदारांचा पाठिंबा
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांना बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बिडी येथे आयोजित केलेल्या प्रचार रॅलीनंतर केले. बिडी येथील पारिश्वाड क्रॉसपासून संगोळ्ळी रायाण्णा सर्कलपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले भाजप कार्यकर्ते व मतदारांना माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मार्गदर्शन केले. बोम्माई पुढे म्हणाले, भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपसाठी सक्रिय काम केले आहे. त्यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम बजावले आहे. खानापूर येथील साखर कारखाना चालविण्यासाठी घेऊन अनेकांच्या हाताला काम दिले आहे. शेतकऱ्यांच्या उसाला अधिक दर देऊन त्यांची वेळोवेळी बिले अदा केली. त्यामुळे खानापूर तालुक्यातील जनमानसात हलगेकर यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांचे कार्य पाहूनच भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. येथील जनतेचा प्रतिसाद पाहता ते निश्चितच प्रचंड मतांनी निवडून येणार यात शंका नाही. राज्यात भाजपचे सरकार येणार असून विठ्ठल हलगेकर आमदार झाल्यास खानापूरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपने कोरोना काळात उत्तम काम केले आहे. भाजप सरकारतर्फे बेळगाव जिल्ह्याला मोठा निधी दिला. जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून खेडोपाड्यातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विजय संकल्प यात्रेदरम्यानच्या कार्यक्रमात नंदगड येथे वीस हजारहून अधिक लोकांनी सहभाग दर्शविल्यामुळे त्याचवेळी येथे भाजपचा आमदार होणार, असा आम्ही निश्चित संकल्प केला. मागील निवडणुकीत झालेला पराभव हा आम्हा सर्वांच्या जिव्हारी लागला होता. यावेळी कोणत्याही परिस्थितीत भाजपचा आमदार व्हावा म्हणून अनेक इच्छुकांनी आपली उमेदवारी मागे घेऊन विठ्ठल हलगेकर यांना पाठिंबा दर्शविला आहे. व भाजपच्या विजयासाठी सर्वजण एकत्रितपणे काम करत आहेत. हीच आमच्या विजयाची नांदी आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार राहिल्याने आम्ही विविध विकासाच्या योजना जनतेपर्यंत पोचविल्या आहेत. किसान सन्मान योजना, शेतकऱ्यांसाठी विमा, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विद्यार्थी वेतन, दीनदलितांसाठी, मच्छीमार व विविध समाजासाठी अनेक योजना राबवून व आरक्षणात वाढ करून सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवा करण्याची संधी द्या
य् ाावेळी भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी आपणाला मतदान करून एकवेळ तालुक्याची सेवा करण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांनी हलगेकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. प्रचार रॅलीत भाजपचे नेते इराण्णा कडाडी, माजी आमदार संजय पाटील, भाजपचे अध्यक्ष संजय कुबल, प्रमोद कोचेरी, उज्ज्वला बडवाण्णाचे, सुरेश देसाई, सदानंद पाटील, चांगाप्पा निलजकर, किरण येळ्ळूरकर, धनश्री सरदेसाई, मंजुळा कापसे, विजय कामत, पी. वाय. देसाई, शिवा मयेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.









