प्रतिनिधी/ सातारा
वन क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यापासून जिह्यात नवनवीन संकल्पना राबविल्या आहेत. नुकतेच गोळीबार मैदान येथे 10 ते 15 हजार झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यात येत आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याबरोबर त्यांचे सामाजिक कार्याची चर्चा जिह्यात होत असते. यामुळे अनेकांना प्रेरणाही मिळत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा वितरण सोहळा पुणे येथे पार पडला. या पुरस्कारची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शेख यांच्यावर जिल्हावासियांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.








