वृत्तसंस्था/ भोपाळ
आयएसएसएफच्या विश्वचषक रायफल आणि पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत भारताची उदयोन्मुख महिला नेमबाज सिफ्त कौर सामराने महिलांच्या 50 मी. 3 पी रायफल नेमबाजीत कास्यपदक पटकावले. मात्र भारताच्या अंजूमकडून निराशा झाली.
महिलांच्या 50 मी. 3 पी नेमबाजी स्पर्धेत चीनच्या झेंग क्यूआँगयुने सुवर्णपदक पटकावले. या क्रीडा प्रकारात भारताच्या सामराने 403.9 गुणासह तिसरे स्थान पटकावत कास्यपदक घेतले. चीनच्या झेंग क्युऑंगयुने सुवर्णपदाकासाठीच्या लढतीत आपली प्रतिस्पर्धी झेकची अॅनेटा ब्रेबकोव्हाचा पराभव केला. झेंगने 414.7 गुणासह सुवर्ण तर ब्रेबकोव्हाने 411.3 गुणासह रौप्यपदक मिळवले. या स्पर्धेच्या पदकतक्त्यात भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. चीनने या तक्त्यात आघाडीचे स्थान मिळवताना एकूण 7 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कास्य अशी एकूण 11 पदके घेतली आहेत. भारताने 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 5 कास्य अशी एकूण 7 पदकांची कमाई केली आहे. महिलांच्या 3 पी 50 मी. रायफल नेमबाजीत भारताच्या अंजूम मोदगीलकडून साफ निराशा झाली. प्राथमिक फेरीतच अंजूमचे आव्हान समाप्त झाले.









