40 पोलीस जखमी ः स्फोटानंतर तीन इमारती जमीनदोस्त
वृत्तसंस्था / कबाल
पाकिस्तानच्या स्वात जिल्हय़ातील कबाल शहरात दहशतवादविरोधी विभागाच्या पोलीस स्थानकावर सोमवारी रात्री आत्मघाती हल्ला झाला आहे. पोलीस स्थानकात दहशतवाद्यांनी दोन स्फोट घडवून आणल्याने इमारतीला आग लागली. या हल्ल्यात 12 पोलिसांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत.
हल्ल्यातील जखमींवर उपचार करण्यासाठी परिसरातील सर्व रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर हल्ल्यानंतर खैबर पख्तूनख्वामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्फोटांमुळे पोलीस स्थानकाचे छत कोसळल्याने त्याखाली अनेक जण दबले गेल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.
स्वात पोलीस प्रमुख शफीउल्लाह यांनी स्फोटानंतर तीन इमारती जमीनदोस्त झाल्याची माहिती दिली. स्फोटामुळे लागलेल्या आगीत पोलिसांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे सैन्य स्वात भागात अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम राबवत आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचे मानले जात आहे.
स्वातमध्ये दहशतवादविरोधी पोलीस स्थानकावर हल्ला झाल्यावर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमवेत पाकिस्तानच्या नेत्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. देशाच्या सुरक्षेकरिता जीव गमाविणाऱया अधिकाऱयांचे योगदान आम्ही सदैव स्मरणात ठेवू असे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी तपास यंत्रणेकडून अहवाल मागविला आहे.









