मेक इन इंडिया अंतर्गत विकसित ः भारताचे सामर्थ्य वाढणार
वृत्तसंस्था / जैसलमेर
राजस्थानच्या जैसलमेर जिल्हय़ातील फील्ड फायरिंग रेंजमध्ये स्वदेशनिर्मित पिनाका क्षेपणास्त्राच्या अपग्रेड व्हर्जनचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. भारतीय सैन्य आणि डीआरडीओ अधिकाऱयांच्या उपस्थितीत पिनाका एमके-रॉकेट सिस्टीमचे यशस्वी परीक्षण पार पडले.
पिनाका क्षेपणास्त्राने स्वतःची क्षमता या परीक्षणातून सिद्ध करून दाखविली आहे. हे क्षेपणास्त्र 45 किलोमीटर अंतरापर्यंतचे लक्ष्य यशस्वीपणे भेदण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्रावर 100 किलोपर्यंत ऍम्युनेशन लोड केला जाऊ शकतो. पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या परीक्षणादरम्यान सर्व लक्ष्यांचा अचूक भेद करण्यात आला आहे. तर सातत्याने यशस्वी होत असलेल्या परीक्षणांमुळे भारतीय सैन्याच्या सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे.
पिनाका एनहान्स्ड रॉकेट सिस्टीम आणि पिनाका एरिया डिनायल म्युनिशन रॉकेट सिस्टीमचे एप्रिल महिन्यात यशस्वी परीक्षण करण्यात आले होते. पिनाका रॉकेट प्रणालीच्या एका नव्या व्हेरियंटचे डीआरडीओ अन् सैन्याकडून पोखरण फायरिंग रेंजमध्ये यशस्वी परीक्षण पार पडले होते. सैन्याच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी रॉकेट सिस्टीमला आधुनिक तंत्रज्ञानासह विकसित करण्यात आले आहे. हे रॉकेट लाँचर 7 किलोमीटरपासून 90 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शत्रूला नष्ट करू शकते.
पिनाका रॉकेट सिस्टीमची वैशिष्टय़े…
-44 सेकंदांमध्ये 12 क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता
-7 कि.मी.पासून 90 कि.मी.पर्यंतचा मारक पल्ला
-अत्यंत वेगाने शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता
-अचूक लक्ष्यभेदामुळे शत्रूचा विनाश निश्चित









