मनपात उपस्थित राहून माफी मागत नाही तोपर्यंत त्यांचे काम थांबविण्याचा ठराव
बेळगाव : नगरसेवकाला उद्धट उत्तर दिल्यामुळे एलईडी बल्बचे टेंडर घेतलेल्या ठेकेदाराला महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये नगरसेवकाने तीव्र शब्दात निषेध नोंदविला. जोपर्यंत तो ठेकेदार महापालिकेत येवून माफी मागत नाही तोपर्यंत त्याला कोणतेही काम किंवा त्याचे बिल द्यायचे नाही, असा ठराव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत सर्वानुमते करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत त्या ठेकेदाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. शहरातील एलईडी बल्ब बसविण्याचे काम साऊथ लाईन प्रॉपर्टी आणि ई-स्मार्ट नाशिक कंपनी या दोघांना देण्यात आले आहे. ई-स्मार्ट कंपनीचे राहुल चक्रवर्ती यांनी उद्धट उत्तरे दिली आहेत. शहरामध्ये लावण्यात आलेल्या एलईडी बल्बमुळे प्रकाश योग्यप्रकारे पडत नाही. याबाबत सर्वसामान्य जनतेने तक्रार केली होती. ती तक्रार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली असता एलईडी कंपनीचे ठेकेदार राहुल चक्रवर्ती यांच्याकडे करा, असे सांगण्यात आले.
त्यानंतर सदर नगरसेवकाने राहुल चक्रवर्ती यांना फोन लावून विचारले असता त्यांनी नगरसेवकाला उद्धट उत्तरे दिली आहेत. तुमचे शिक्षण किती झाले आहे? असा प्रश्न त्या ठेकेदाराने केला. एलईडी बल्बसाठी मी बेळगावमध्ये येवू का? अशी उत्तरे त्या ठेकेदाराने दिल्याची माहिती नगरसेवकाने सभागृहात मांडली. त्यानंतर सर्वच नगरसेवकांनी त्याला आक्षेप घेतला. कंत्राटदाराला दिलेल्या कामाचा संपूर्ण तपशील मागितला. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदर कंपनीला दिलेल्या टेंडरबाबतची माहिती त्यांनी दिली. त्यावर नगरसेवकांनी संबंधित कंपनीचे काम थांबवावे, याचबरोबर त्यांना कोणत्याही प्रकारची बिले देऊ नये, अशी मागणी केली. ठेकेदाराने नगरसेवकाला उद्धट उत्तरे दिल्यामुळे संपूर्ण नगरसेवकांचा हा अपमान आहे. तेव्हा जोपर्यंत उपस्थित राहून माफी मागत नाही तोपर्यंत त्यांचे काम थांबवावे, अशी मागणी केली. याबाबत बैठकीत ठराव करून निषेध नोंदविण्यात आला. महापौर शोभा सोमणाचे यांनी जोपर्यंत ठेकेदार येत नाही तोपर्यंत त्यांना कोणतेच काम द्यायचे नाही, असा ठराव केला. त्याला सर्वांनी अनुमती दिली.









