महादेव बुक’सह 22 बेकायदेशीर अॅप्स-वेबसाईट्स ब्लॉक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने महादेव अॅपसह 22 बेकायदेशीर बेटिंग अॅप्स आणि वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे आदेश रविवारी जारी केले. बेकायदेशीर सट्टेबाजी अॅपच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासानंतर आणि छत्तीसगडमधील महादेव बुकवर टाकलेल्या छाप्यानंतर ही कारवाई करण्यात आला. या कारवाईदरम्यान सदर अॅपचे बेकायदेशीर कारनामे उघड झाले आहेत. महादेव बुकचा मालक सध्या कोठडीत असून त्याला मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 19 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
ईडीच्या विनंतीवरून केंद्र सरकारने महादेव अॅपसह 22 अॅप्स आणि वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत. राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी रविवारी यासंबंधी माहिती दिली. काही महिन्यांतच देशभरातील 12 लाखांहून अधिक लोक महादेव बुक नावाच्या या अॅपमध्ये सामील झाले होते. याद्वारे लोकांनी क्रिकेटपासून निवडणुकीपर्यंत सर्व गोष्टींवर सट्टा लावण्यासाठी या अॅपचा वापर करण्यास सुऊवात केली. एवढेच नाही तर कोरोना महामारीनंतर या अॅपचा व्यवसाय खूप वेगाने वाढल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
छत्तीसगड सरकारला आयटी कायद्याच्या कलम 69-अ अंतर्गत वेबसाईट/अॅप बंद करण्याची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार होता. तथापि, त्यांनी तसे केले नाही. तसेच कोणतीही विनंती केंद्र सरकारला केली नाही. गेल्या दीड वर्षांपासून त्यांचे कारनामे सुरू असतानाही राज्य सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, असे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता, आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले आहे.









