विवाह सोहळ्यासाठी जात असताना कारला दुर्घटना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील कुंडरकी पोलीस स्टेशन परिसरात आग्रा-मुरादाबाद महामार्गावर चालकाला झोप लागल्याने कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकून अपघात झाला. या भीषण अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. सदर कुटुंब मुंबईतील असून एका नातेवाईकाच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी दिल्लीहून कारने मुरादाबादच्या कुंडरकी शहरात जात असताना अपघात झाला. या अपघातानंतर लग्न सोहळा असणाऱ्या घरात दु:खाची छाया पसरली आहे.
मुरादाबाद आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अचानक एक कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने एकच खळबळ उडाली. कारमध्ये दोन मुली, एक महिला आणि एक पुऊष होता. कारमधील चौघेजण आपल्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. या घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.









