रेल्वे ‘फुल्ल’ झाल्याने महसुलात वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवासाठी भाविकांना गावी पोहोचता यावे यासाठी यशवंतपूर-बेळगाव या मार्गावर सोडण्यात आलेल्या उत्सव स्पेशल रेल्वेला प्रवाशांनी तुफान प्रतिसाद दिला. मंगळवारी रात्री निघालेली उत्सव स्पेशल बुधवारी सकाळी बेळगावमध्ये दाखल होणार आहे. रेल्वे प्रवाशांनी खचाखच भरल्याने नैर्त्रुत्य रेल्वेच्या महसुलात वाढ झाली. बेंगळूर परिसरातून गणेशोत्सवासाठी बेळगावला येणाऱया प्रवाशांनी उत्सव स्पेशल रेल्वेची मागणी केली होती. त्यानुसार नैर्त्रुत्य रेल्वेने यशवंतपूर-बेळगाव व बेळगाव-यशवंतपूर अशी उत्सव स्पेशल रेल्वे जाहीर केली. मंगळवार दि. 30 रोजी रात्री 9.30 वा. यशवंतपूर येथून निघालेली एक्स्प्रेस बुधवारी सकाळी 8.30 वा. बेळगावमध्ये दाखल होणार आहे. बेंगळूर-बेळगाव, बेंगळूर-मिरज (चन्नम्मा एक्स्प्रेस), यासह संपर्क क्रांती एक्स्प्रेस विश्वमानव एक्स्प्रेस, तिरूवेनवेल्ली-दादर एक्स्प्रेस, अजमेर एक्स्प्रेस या रेल्वेंनी प्रवासी बेळगावमध्ये दाखल झाले.
उत्सव स्पेशल रेल्वेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. स्लीपर कोचसाठी 28 वेटिंग असल्याचे मंगळवारी दुपारपर्यंत दिसून येत होते. गणेशोत्सव काळात उत्सव स्पेशल रेल्वे सुरू केल्याने प्रवाशांची सोय तर झालीच पण त्याचबरोबर रेल्वेलाही चांगला महसूल मिळाला.









