प्रतिनिधी /खानापूर
तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या खानापूर शहरात मंगळवारी खरेदीसाठी उत्साही गर्दी झाली होती. ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात आले होते. शिवस्मारक चौकापासून ज्ञानेश्वर चौकापर्यंत तसेच बाजारपेठ ते पारिश्वाड क्रॉस संपूर्ण बाजार गर्दीने फुलून गेला होता. महागाईचे सावट असतानाही विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी फळे, सजावटीचे साहित्य, फटाके, माटोळय़ाचे साहित्य खरेदीसाठी एकच झुबंड उडाली होती. सकाळी 11 च्या सुमारास पावसामुळे खरेदीसाठी आलेल्या लोकांची तारांबळ उडाली. मात्र त्यानंतर दिवसभर ऊन पडल्याने लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
खानापूर बाजारपेठेत प्रत्येक वस्तूचे दर गगनाला भिडलेले असतानाही ग्राहकांची खरेदीत उत्साह दिसत होता. स्टेशनरोडवरील बाजारात फळे विक्रेत्यांची दुकाने अधिक दिसून येत होती.
राजा शिवछत्रपती चौकात मोठय़ा प्रमाणात दुचाकी लावण्यात आल्याने वाहतुकीचा बोजबारा उडाला होता. त्यामुळे पोलिसांना होणाऱया गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही प्रयत्न करावे लागत होते. त्यातच भर रस्त्यावर फळविक्रेते, भाजीविक्रेते, नारळ, माटोळी साहित्य यासह इतर साहित्य विक्रेते रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसल्यामुळे बाजारात तोबा गर्दी झाली होती. गणेश पूजनात पत्री व फुलाना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. त्यामुळे बाजारपेठेत फुलांचे हारही विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. पावसामुळे फुले मिळत नसल्याने एरवी 5 रु. ला मिळणारा हार 25 रुपये तर 10 रु. दराने मिळणारा हार 40 रु. ला विक्री केला जात होता. तर चांगल्या प्रतीचे हार 50 ते 100 रु. दराने विक्री केले जात होते. सायंकाळी उशिरापर्यंत बाजारात ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांची गर्दी दिसून येत होती.









