खानापूर : भांडुरा प्रकल्प राबविण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्नशील आहे. या विरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच पर्यावरणप्रेमीनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला असून या विरोधात येथील लोकमान्य सभागृहात बैठक घेऊन या प्रकल्पाला विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींच्यावतीने भांडुरा प्रकल्पाच्या विरोधात निवेदन देवून भांडुरा प्रकल्प राबविण्यासाठी देण्यात आलेल्या नोटिसी मागे घ्याव्यात,
तसेच प्रकल्पाचे काम थांबविण्याची मागणी केली आहे. तहसीलदारांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण निवेदन वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी सतीश पाटील, सुजीत मुळगुंद, अॅङ नीता पोतदार, नायला कोयला, शिवलीला मिसाळे, दीपक जमखंडी, गीता साहू, शारदा गोपाळ, असिफ मुल्ला यांच्यासह इतर पर्यावरणवादी उपस्थित होते. नेरसा येथील भांडुरा नाला वळवून भूमिगत पाईपलाईनद्वारे हे पाणी नविलतिर्थला नेण्यात येणार आहे. भूमिगत पाईपलाईन घाण्यासाठी शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाची नोटीस देण्यात आली आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठविलेला आहे. पर्यावरणप्रेमी आणि शेतकऱ्यांची संयुक्तीक बैठक लोकमान्य सभागृहात बुधवारी पार पडली. या बैठकीत प्रकल्पाला विरोध करण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात भूसंपादनासाठी देण्यात आलेल्या नोटिसी मागे घेण्यात याव्यात, तसेच तालुक्याचा संपूर्ण पश्चिम घाट हा संवेदनशील आणि इकोसेन्सेटीव्हच्या प्रथमश्रेणीत मोडतो. यासाठी या ठिकाणी निसर्गाला हानी पोचविल्यास याचे परिणाम संपूर्ण निसर्गावर होऊन याचे विनाशकारी परिणाम होणार आहेत. कळसा आणि भांडुरा प्रकल्प राबविल्यास 700 चौरस कि. मी. भीमगड आणि म्हादई अभयारण्याला धोका पोहचणार आहे. त्यामुळे संपूर्ण पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे खानापूर तालुक्यालाही धोका आहे. नेरसा येथे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच प्रकल्पासाठी लागणारे पाईप आणि इतर साहित्य निर्मितीचे काम सुरू आहे. हे तातडीने थांबविण्यात यावे, आणि या प्रकल्पाच्या होणाऱ्या गंभीर परिणामाचा विचार करून हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.









