वारकऱ्यांत उत्साह, पादुकांचे दर्शन, विविध कार्यक्रमांची रेलचेल
बेळगाव : अनगोळ येथील एसकेई एज्युकेशन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळ्याअंतर्गत तुकोबांच्या अखंड गाथा पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने काकड आरती, गाथा वाचन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आदी भरगच्च कार्यक्रम होत आहेत. रविवारी पहाटे काकड आरती, त्यानंतर तुकाराम महाराजांच्या पादुकांना अभिषेक, भागवत ध्वजारोहण आणि त्यानंतर तुळसी पूजन झाले. तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर यांच्या हस्ते तुकोबांच्या अखंडा गाथा पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला. या गाथा पारायण सोहळ्याच्या पहिल्या दिवशी भाविक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी किणये येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सायंकाळी 5 ते 6 या वेळेत हरिपाठ व त्यानंतर स्वामी चित्प्रकाशानंद सरस्वती यांचे प्रवचन झाले. रात्री 7 ते 9 या वेळेत श्री संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज हभप योगीराज महाराज गोसावी यांचे कीर्तन झाले. यावेळी वारकरी आणि भक्त उपस्थित होते. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळा उत्साहात प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत शनिवारी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज श्री गुरु पुंडलिक महाराज देहुकर यांच्या उपस्थितीत शनिवारी दिंडी सोहळा झाला. जगद्गुरु तुकोबांचा 375 वा सदेह वैकुंठगमन सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न होत आहे. याचाच एक भाग म्हणून बेळगाव शहरात हा सोहळा आयोजित केला आहे.
तुकोबांच्या पादुकांचे दर्शन
श्रीक्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या पादुका बेळगाव शहरात दाखल झाल्या आहेत. गाथा पारायण सोहळ्याच्या कार्यक्रमस्थळी ही पालखी ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी होऊ लागली आहे.









