आयोजनाचे पाचवे वर्ष
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकमान्य सोसायटी प्रायोजित आणि एसकेई सोसायटी आणि बीजेपीएसएस यांच्या सहकार्याने आकाशकंदील प्रदर्शन व विक्री उद्घाटनाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, बेळगाव जिल्हा प्राथमिक समितीचे ज्ञानेश कलघटगी, प्रवीण पुजार, लोकमान्य सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी राजू नाईक, स्पर्धा परीक्षक उमेश चन्नप्पगौडर, जगदीश कुंटे, सुभाष देसाई, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे प्रदर्शन पुढील तीन दिवस हेरवाडकर हायस्कूलच्या पटांगणात भरविण्यात आले असून पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने हे प्रदर्शन आयोजित होत असून यामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्वत: बनविलेले आकर्षक आकाशकंदील मांडले आहेत. मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ, भव्य शामियाना, आकर्षक साज-सजावट, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्या आहे. विद्यार्थ्यांना स्वकर्तृत्वातून आत्मविश्वास मिळावा आणि त्यांच्या कला-कौशल्यांना प्रोत्साहन मिळावे, हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.









