महापालिकेकडून स्वच्छता मोहीम राबविण्यासह शेण टाकणाऱ्यांना केली सूचना
बेळगाव : शहर व उपनगरातील ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी शहर स्वच्छता ठेकेदार आणि महानगरपालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील बीएससी मॉलजवळ गवळी गल्लीतील काही जनावर मालकांकडून शेण टाकले जात होते. त्यामुळे महापालिकेकडून तेथील शेण हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. यापुढे त्या ठिकाणी शेण किंवा कचरा टाकण्यात येऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे. तेथील संरक्षण भिंतीवरही रंगरंगोटी करण्यात आली असून सुका व ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासंदर्भातील संदेश देणारी चित्रे रेखाटण्यात आली आहेत.
कचरा समस्या दूर व्हावी यासाठी महापालिकेकडून शहरातील सर्व 58 प्रभागांचा स्वच्छतेचा ठेका बेंगळूर येथील एका ठेकेदाराला देण्यात आला आहे. सदर ठेकेदाराकडून 1 ऑगस्टपासून कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी नवीन वाहने दाखल झाली आहेत. तसेच नवीन सफाई कर्मचाऱ्यांचीही भरती करण्यात आली आहे. तरीदेखील शहरातील कचऱ्याची समस्या दूर होताना दिसत नाही. उलट पुन्हा एकदा जिकडेतिकडे ब्लॅक स्पॉट निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात आहे, तेथे आकर्षक सजावट करून सूचना फलक लावले जात आहेत. मात्र सकाळच्यावेळी येणारी घंटागाडी वेळेवर येत नसल्याने घरातील कचरा नाईलाजास्तव रस्त्याच्या कडेला फेकून दिला जात असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे शहरातील गल्लीबोळात घंटागाडी घरोघरी पाठविण्यात यावी. जेणेकरून ब्लॅक स्पॉट निर्माण होणार नाहीत, असे मत जाणकारांतून व्यक्त केले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील बीएससी मॉलनजीक गवळी गल्लीतील काहीजणांकडून शेण टाकले जात होते. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत होती. ही बाब लक्षात घेत महापालिकेकडून सदर परिसर स्वच्छ केला असून यापुढे त्या ठिकाणी शेण किंवा कचरा टाकण्यात येऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.









