प्रवाशांच्या संख्येनुसार आठ ते दहा बसेसची सोय करण्यात येणार
वार्ताहर /नंदगड
खानापूर शहरालगत असलेल्या करंबळ गावची तसेच नंदगडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बेकवाड गावची लक्ष्मी यात्रा बुधवार दि. 28 पासून होत आहे. दोन्ही यात्रा मोठ्याप्रमाणात होणार असल्याने यात्रेकरूही मोठ्या संख्येने जमा होणार आहेत. येण्या जाण्यासाठी बस सुविधा आवश्यक असल्याने खानापूर बस आगारातर्फे यात्रा काळातील नऊ दिवसात विशेष बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. करंबळ गावच्या लक्ष्मी यात्रेत करंबळ, जळगे, रुमेवाडी, होनकल, कौंदल आदी गावांचा समावेश आहे. तर बेकवाड यात्रेत बेकवाड या एकमेव गावाचा समावेश आहे. वरील गावातील लोकांचे बेळगाव, खानापूर, धारवाड, हुबळी, पणजी, कोल्हापूर, पुणेसह विविध गावात पै पाहुणे व मित्रपरिवार आहेत. त्यांना यात्रेला येण्यासाठी सोय व्हावी म्हणून करंबळ व बेकवाड येथील यात्रोत्सव कमिटीने बस आगारप्रमुखांना यात्रा काळात बससेवा सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. तसेच खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी आगार व्यवस्थापक महेश तिरकन्नावर, इन्स्पेक्टर विठ्ठल कांबळे यांना भेटून लागलीच करंबळ येथे उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यानुसार बस आगार व्यवस्थापक महेश तिरकन्नावर यांनी करंबळला भेट दिली. तेथील एका खासगी खुल्या जागेत यात्राकाळापुरता बस थांबून तिथून येण्या-जाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन आगार प्रमुखांनी दिले बेळगाव, खानापूर, करंबळ, नंदगड, बेकवाड, बिडी व पुन्हा बिडीहून त्याचमार्गे बेळगावला परत बस जाणार आहे. त्यामुळे बेळगावहून करंबळ व बेकवाड येथे येणाऱ्यांची चांगलीच सोय होणार आहे. यावेळी यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष महादेव घाडी, खजिनदार जयंत पाटील, अॅड. ईश्वर घाडी, रेवणसिद्धय्या हिरेमठ, आप्पाजी पाटील, अॅड. अनंत देसाई, गोविंद पाटील, गंगाधर दळवी, नारायण पाटील आदी उपस्थित होते.









