वार्ताहर /सांबरा
सांबरा येथील दाम्पत्याने श्री महालक्ष्मी यात्रेमध्ये अहेर देण्या ऐवजी रोपटे देऊन अहेर प्रथेला फाटा देत एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. सांबरा येथील सागर गुरुनाथ चौगुले व माधुरी या दाम्पत्याने अहेर प्रथा बंद व्हावी यासाठी पुढाकार घेतला असून समाजामध्ये जागृती करण्यास प्रारंभ केला आहे. सध्या अहेर प्रथेमुळे लोकांवर कर्जाचे ओझे वाढत चालले आहे व अहेर प्रथेमुळे देवाणघेवाणीचे प्रमाण फार वाढले असून गंमत म्हणजे अहेरातून दिलेली साडी किंवा शर्ट पीस वापरला जात नाही. तो परत परत यात्रा किंवा लग्नामध्ये अहेर म्हणून दिला जातो. आधीच महालक्ष्मी यात्रा म्हटली की भरमसाठ खर्च असतो. त्यामुळे मराठा समाज कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. यासाठी ही प्रथा बंद होणे काळाची गरज असल्याचे चौगुले दांपत्याचे मत आहे. बसरीकट्टी येथे सुरू असलेल्या महालक्ष्मी यात्रेमध्ये त्यांनी अहेर देण्याऐवजी झाडाचे रोपटे देऊन पाहुण्यांचा मानपान केला. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
पर्यावरणाचे रक्षण म्हणून हा उपक्रम
सध्या धाकधुकीच्या जीवनामध्ये आपल्याला आरोग्यदायी जीवन जगायचे असेल तर स्वच्छ प्राणवायू मिळणे खूप गरजेचे आहे. यासाठी झाडांची संख्या वाढणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी म्हणून आम्ही अहेर ऐवजी झाडांचे रोपटे देऊन जागृती करत आहोत. यासाठी मराठा समाजाने विचार करून अहेर प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तरच मराठा समाजाचा उद्धार होणार आहे.
– सागर चौगुले सांबरा









