सण-उत्सवांची विशेष रेलचेल असलेल्या चांद्र कालगणनेतील पाचवा महिना श्रावण सध्या अंतिम टप्प्यात असून, यंदा निज श्रावण असल्याकारणाने, पहिल्या महिन्याला श्रावण म्हटलेले असले तरी व्रत-वैकल्य, सण-उत्सवांचे नियोजन अधिक मासाऐवजी निज श्रावणात करण्यात आलेले आहे. गोवा-महाराष्ट्रातल्या एकंदर लोकमानसात चातुर्मासातल्या या महिन्याला विशेष असे धार्मिक महत्त्व दिलेले आहे. सूर्य सिंह राशीत प्रवेश करीत असताना या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा आसपास श्रावण नक्षत्र येत असल्याकारणाने, त्याला श्रावण नाव प्राप्त झालेले आहे. आपल्या आकाशगंगेतल्या ग्रहतारे यांना इथल्या लोकमानसाने पूर्वापार महत्त्व दिलेले असून, नक्षत्रानुसार त्यांनी दैनंदिन जीवनात येणाऱ्या सण-उत्सवांची सांगड घातलेली आहे. ग्रीष्म ऋतूतच मान्सूनचे वारे आपल्याकडे पावसाच्या आगमनास कारणीभूत ठरतात. ज्येष्ठात सुरू झालेला पाऊस आषाढ महिन्यात स्थिरावतो आणि त्यामुळे शेतात काम करणारी कष्टकरी मंडळी, पावसाच्या धारांची पर्वा न करता, आपण काळ्या-तांबड्या मातीत पेरलेल्या धान्याच्या कणांना सृजनोत्सवात न्हाताना पाहून सुखावतात.
श्रावणात परिसरातल्या वृक्षवेलींना जी चैत्रात नवी पालवी फुटलेली असते, तिला नवी लकाकी लाभलेली असते आणि श्रावणाच्या मध्यावरती फुले, फळे यांच्या आविष्काराने त्यांचे सौंदर्य आणखी खुलू लागते. माळरानावरती जंगली पुष्पांची विविध रंगांची उधळण सुरू होते आणि त्याच्यावर फुलपाखरे स्वच्छंदपणे भिरभिरू लागतात. पठारावरती फुललेली फुले श्रावण महिन्याच्या सौंदर्याला आगळी-वेगळी अशी देणगी देतात आणि त्यामुळेच जणूकाही इथल्या लोकमानसाने या रानफुलांना आपल्या लोकधर्मात महत्त्वाचे स्थान प्रदान केलेले आहे. श्रावणात येणाऱ्या विविध व्रत-वैकल्यात जसा मौसमी फुलांचा वापर केला जातो तसाच त्या काळात उपलब्ध रानभाज्या, नवी पाने, तृणपाती आदी वनस्पती वैभवाला पूजन परंपरेत स्थान बहाल केले जाते. श्रावणातल्या सोमवारपासून ते रविवारपर्यंतच्या सात दिवसांशी ज्या व्रत वैकल्यांचे नियोजन केलेले असते, त्यात साजऱ्या होणाऱ्या शिवामूठ, मंगळागौर, दत्तोपासना, लक्ष्मी पूजन, हनुमान पूजन, आदित्योपासना यात मौसमी फळा-फुलांचा चपखलपणे उपयोग केला जातो. नागपंचमीच्या सणासाठी मृण्मयी नाग मूर्तीची स्थापना अळूच्या हिरव्या पानावरती करण्याबरोबर त्याची पूजा करण्यासाठी त्यावेळी उपलब्ध तृणपाती, फुले आदी नैसर्गिक घटकांचा उपयोग करण्यात येतो. नागपंचमीसाठी गोवा-कोकणात हळदी पानांत लपेटून तांदळाच्या मळलेल्या पिठात गुळ, खोबरे आदी घटक घालून वाफेवरती उकडलेल्या पातोळ्यासारख्या गोड पदार्थाचा आस्वाद घेतला जातो. अळूच्या मौसमी पानांची केलेली भाजी नागपंचमीसाठी हवीच. रविवारी आदित्य पूजनाची परंपरा असून, प्रत्येक रविवारी तांदुळापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या स्वरुपाच्या पदार्थांची चव घेणे महत्त्वाचे मानलेले आहे. श्रावणात शाकाहाराला प्राधान्य असल्याकारणाने महिन्याभरात येणाऱ्या प्रत्येक सण-उत्सवाच्याप्रसंगी वेगवेगळ्या चवीच्या अन्नपदार्थांची सांगड घालण्यात आलेली आहे.
श्रावणात निसर्गातल्या हिरवाईच्या वैभवाला खूपच आगळी-वेगळी उंची लाभत असल्याने, त्याचे वर्णन शब्दांत पकडण्याचा प्रयत्न कवी-लेखकांनी मराठी साहित्यात सुरेखरित्या केलेला आहे परंतु ‘श्रावणात घननिळा बरसला’ हे कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठी लिहिलेले गीत त्यांनी आपल्या भावमधुर स्वरांनी अजरामर केलेले आहे. त्यात वर्णन केलेला घननिळा ही खरेतर श्रावणाची अस्मिता ठरलेली आहे. मान्सूनच्या कालखंडात पावसाच्या अगणित थेंबांनी समृद्ध असलेले ढग आकाशाचे सौंदर्य खुलवत असतात आणि अशा घननिळ्याचे बरसणे श्रावणातल्या वृक्षवेलींना विभोलभनीय फुलांची संपत्ती प्रदान करीत असते. आकाशात दृष्टीस पडणाऱ्या या घननिळ्यातून श्रीकृष्णाचे दर्शन भाविकांना झाले असावे आणि त्यामुळेच बाळकृष्णाच्या लीलांबरोबर दहीहंडीला उत्सवात स्थान दिलेले आहे, ते गोकुळाष्टमीला.
‘कृष्णंवदे जगद्गुरु’ असे श्रीकृष्णा संदर्भात इथल्या धर्मसंस्कृतीत जी पूर्वापार श्रद्धा आहे, त्याला लोकमानसाने त्याच्यात जसा खोडकरपणा करणारा बाळकृष्ण पाहिला, तसाच महाभारत युद्धात ‘न धरी शस्त्र करी’ असे म्हणून धनुर्धारी अर्जुनाला रणांगणावरती भगवद्गीतेचा अत्यंत मार्मिकपणे उपदेश करणारा आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा तत्त्वचिंतक पाहिला होता. आज ही श्रीकृष्णाची विविध रुपे इथल्या लोकमानसाने अतिव श्रद्धेने पाहिली असली तरी त्याचे गोपगवळणीत रमणारे, डोक्यावरची दह्याने भरलेली मडकी फोडून त्यातले दही आपल्या सवंगड्यांसह आस्वाद घेणारे रुप विशेष लोकमान्य ठरलेले आहे. आज माणसाचे जीवन नाना प्रकारच्या ताणतणावाने इतके भरलेले आहे की, त्यामुळे आसुरी पद्धतीने ओरबाडून घेणारे सुख त्याला समाधान देऊ शकत नाही आणि त्यामुळे आकाशातल्या घननिळ्यातून प्रतिबिंबित झालेला श्रीकृष्ण त्याच्या तनामनाला अधिक भावलेला आहे.
श्रावण महिन्यात आकाशात जसा घननिळा दृष्टीस पडत असतो. त्याचप्रमाणे जांभ्या दगडांनी युक्त पठारावरतीसुद्धा विविध प्रकारच्या रानफुलांतून निळाईचा रंग प्रसन्नतेचा शिडकावा करीत असतो. गुलाबी, पिवळ्या, लाल, केशरी अशा विविध रंगांचे सुंदर दर्शन मौसमी रानफुलांतून घडत असले तरी त्यातला निळा रंग आपले देखणेपण निसर्गप्रेमीला खुलवत असतो. त्यामुळेच त्यांना इथल्या रानफुलांचे निरीक्षण करताना निसर्गातली ही निळाई व्यापते. हा निळा रंग चित्रकारांना, मूर्तीकारांना, कारागिरांना इतका भावला की, त्यांनी बाळकृष्ण असो अथवा तरुणाईच्या उंबरठ्यावरती असणारा कृष्ण किंवा भगवद्गीतेचा उपदेश करणारा श्रीकृष्ण निळ्या रंगाने समूर्त केला. कोकणातल्या दशावतारी नाट्याकलाकारांना जेव्हा लोकनाट्यात श्रीकृष्णाची भूमिका साकारायची असते, तेव्हा आपल्या चेहऱ्याची रंगरंगोटी करताना निळ्या रंगाचा वापर अत्यंत खुबीने करतात. निळ्या रंगातला श्रीकृष्ण दशावतारी लोकनाट्यातून विविध भावछटांचा आविष्कार घडवतो, तेव्हा त्याच्या रुपासमोर ग्रामीण प्रेक्षक देवत्त्व अनुभवून नतमस्तक होतात.
श्रावण महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या अष्टमीला जेव्हा आकाश अक्षरश: फाटून पर्जन्यधारा कोसळत होते तेव्हा रात्रीच्या अंधारात देवकीच्या पोटी कंसाच्या तुरुंगात बाळकृष्णाचा जन्म होतो. वासुदेव टोपलीत नवागत अशा बालकाला घालून, यमुना नदी ओलांडून बाळकृष्णाची रवानगी नंदाच्या गोकुळात यशोदेकडे करतो. पर्जन्यधारांनी समृद्ध अशा घननिळ्या रंगातून कवी, कलावंतांना श्रीकृष्णाचे सुंदर आणि विलोभनीय असे रुप पाहायला मिळाले ते त्यांच्या कल्पना विश्वात आणि त्यासाठी त्याच रंगाने त्याचे साजिरे रुप त्यांनी समूर्त केले. केवळ पंढरपुरातच आणि महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा-कर्नाटकातल्या गावोगावी आणि शहरोशहरी कृष्णवर्णीय रंगातल्या मूर्ती स्वरुपात श्रीकृष्ण, श्री विठ्ठल यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली आपणाला वाहायला मिळते. श्रावण महिन्यात हळदीच्या रंगाचे ऊन, क्षणात सरसर येणारा पाऊस आणि मध्येच डोकावणारी सूर्यकिरणे, हिरव्यागार गालिच्यासारखी अथांग पसरलेली सह्याद्रीतली माळराने आदी नयनरम्य दृश्यांनी श्रावण सौंदर्य परिपूर्ण असते. अशा पार्श्वभूमीवर आकाशातला घननिळा पाहताना, त्यातून श्रीकृष्णाचा प्रत्यय लोकमानसाला आला असावा आणि त्यामुळे त्याचा रंग त्यांनी नृत्य, नाट्या, गायन आदीत रमणाऱ्या श्रीकृष्णाला दिला आणि त्यातून आपले जगणे अर्थपूर्ण केले होते.
– राजेंद्र पां. केरकर








