विक्रम लँडरने शाधले चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे तापमान : इस्रोने जारी केला आलेख
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेची सुऊवात झाली असून प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण सुरू केले आहे. तसेच विक्रम लँडरने तापमानाची नोंद पाठवल्याची माहिती इस्रोने रविवारी ट्विट करत दिली. अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात पहिल्यांदा चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण केले. पृष्ठभागाच्या खाली 10 सेंटिमीटरपर्यंत तापमानात फरक दिसून येत असल्याचे इस्रोने आलेखाच्या माध्यमातून दर्शवले आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर पहिल्यांदाच इस्रोने मातीच्या तापमानाचा आलेखही शेअर केला आहे. आलेखामध्ये तापमान उणे 10 अंश सेल्सिअस ते 50 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. दक्षिण ध्रुवाभोवती चंद्राच्या मातीचे तापमान प्रोफायलिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चांद्र मोहिमेद्वारे पाठविण्यात आलेल्या उपकरणांमध्ये 10 वेगवेगळे तापमान सेंसर आहेत. या आलेखामध्ये चंद्राच्या तापमानातील फरक दाखविला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील वातावरणाची ही पहिलीच स्थिती स्पष्ट झाली असून पुढील संशोधनही सुरू आहे.
भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्राविषयी माहिती देण्यास सुऊवात केली आहे. विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञानवरील सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत. लँडर विक्रमने चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान शोधले आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान जाणून घेण्यासाठी विक्रम लँडरवरील चंद्र पृष्ठभाग थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट पेलोडवरून पहिले निरीक्षण केले गेले. इस्रोने जारी केलेल्या आलेखामध्ये पेलोड जसजसे खोलीकडे सरकत आहे तसतसे चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात चढ-उतार दिसत आहेत.









