वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
कॅनडाच्या मार्को अॅरोपने डावपेचांत बदल करून प्रतिस्पर्ध्यांना हुलकावणी देत पुरुषांच्या 800 मी. शर्यतीचे सुवर्णपदक पटकावले. सर्वसाधारणपणे धावताना तो नेहमी आघाडीवर दिसतो. पण यावेळी तो पहिल्या लॅपवेळी सर्वात मागे होता. ते पाहून प्रतिस्पर्धी चकित झाले असतानाच अंतिम टप्प्यात त्याने आपला वेग वाढवला आणि जेतेपद पटकावले. गेल्या वर्षी त्याने कांस्यपदक मिळविले होते. त्याने येथील शर्यत 1:44.24 सेकंदात जिंकली. केनियाच्या इमॅन्युअल वानयोनयीने 1:44.53 से. वेळ नोंदवत रौप्य तर ब्रिटनच्या 21 वर्षीय बेन पॅटिन्सनने स्पेनच्या अॅड्रियन बेनला मागे टाकत कांस्य पटकावून सर्वांना चकित केले. त्याने 1:44.83 से. वेळ नोंदवली.
पुरुष रिलेत अमेरिकेला जेतेपद

अमेरिकेच्या नोह लिलेसने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिसरे सुवर्ण पटकावताना 4×100 मी. रिले संघाला जेतेपद मिळवून दिले. या शर्यतीत तो शेवटच्या टप्प्यात धावताना दिसला. अमेरिकन रिले संघाने 37.38 सेकंद वेळ घेत पहिले स्थान मिळविले. ऑलिम्पिक चॅम्पियन इटलीने 37.62 से. वेळ घेत रौप्य, जमैकाने 37.76 से. वेळ नोंदवत कांस्यपदक मिळविले. इटली संघात टोकियो ऑलिम्पिकमध्ये 100 मी.चे सुवर्ण मिळविणाऱ्या मार्सेल जेकबचा समावेश होता. विजेत्या अमेरिकन संघात लिलेससह ख्रिश्चन कोलमन, फ्रेड केर्ली , ब्रँडन कार्नेस यांचा समावेश होता. लिलेसचे हे या स्पर्धेतील तिसरे पदक आहे.









