सुरुवातीची किंमत 16.19 लाख राहणार असल्याची माहिती : कंपनी विकणार फक्त 500 कार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
स्कोडाने भारतात लोकप्रिय कुशाक एसयूव्ही लिमिटेड मॅट एडिशन लॉन्च केली आहे. कुशाक मॅट एडिशनची सुरुवातीची किंमत 16.19 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनी देशात स्कोडा कुशक मॅट एडिशनच्या फक्त 500 गाड्याच विकणार आहे. स्कोडा कुशाकने जुलै 2021 मध्ये बाजारात पदार्पण केले आहे. स्कोडा कुशाकची सर्व-नवीन आवृत्ती लोकप्रिय कार्बन स्टीलमध्ये मॅट फिनिशमध्ये रंगवण्यात आली आहे. स्कोडाने एसयूव्हीच्या ग्रिल, ट्रंक गार्निश आणि विंडो गार्निश वर नवीन घटक देखील जोडले आहेत. स्कोडा कुशाक मॅट हे मॉडेल कंपनीने दोन प्रकारांमध्ये बाजारात दाखल केले आहे. यामध्ये मॅटच्या मागील बाजूस 1.5 टीएसआय बॅज आहे. यासोबतच अत्याधुनिक सुविधांयुक्त कारही भारतीय बाजारात दाखल केली असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे. सदरच्या कारला भारतीय बाजारात आगामी काळात ग्राहकांची मोठी पसंती मिळणार असल्याचा दावा कंपनीने यावेळी केला आहे.









