पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा रिंगरोडला पर्याय : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
बेळगाव : सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी गांधीनगर ते पिरनवाडीपर्यंत फ्लायओव्हरबाबत वक्तव्य केले. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र ही योजना राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून अंमलात आणावी लागणार आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकार याबाबत किती सहकार्य करणार, हे पाहावे लागणार आहे. पालकमंत्र्यांच्या फ्लायओव्हरच्या वक्तव्याने शेतकऱ्यांसह साऱ्यांनाच दिलासा मिळाला आहे. मात्र, याबाबत पालकमंत्र्यांनी ठोस भूमिका बजावणे गरजेचे आहे. सध्या रिंगरोड तसेच हलगा-मच्छे बायपास करण्यावरून गेल्या 10 वर्षांपासून मोठा गोंधळ उडाला आहे. रिंगरोड, हलगा-मच्छे बायपासमुळे शेतकऱ्यांच्या पिकावू जमिनी नाहीशा होणार आहेत. त्यामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहेत. यासाठी फ्लायओव्हर झाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गांधीनगर ते पिरनवाडीपर्यंत फ्लायओव्हर झाल्यास शेतकऱ्यांच्या जमिनीबरोबरच सरकारचेही पैसे वाचणार आहेत. यासाठी आता पालकमंत्र्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
फ्लायओव्हर झाल्यास मोठा फायदा
रिंगरोडमध्ये तालुक्यातील 32 गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. जवळपास 1200 एकरहून अधिक जमीन यात जाणार आहे. हलगा-मच्छे बायपासमध्येही 134 हून अधिक एकर जमीन जाणार आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी भूमिहीन होणार आहे. यासाठी फ्लायओव्हर झाल्यास मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी देखील फ्लायओव्हरबाबत अनेकवेळा चर्चा झाल्या आहेत. शहरात विविध भागांमध्ये फ्लायओव्हर करण्याबाबत महापालिकेमध्येही चर्चा झाली. पालकमंत्र्यांनी घोषणा केलेली असली तरी भविष्यात फ्लायओव्हर होणार का, हे पाहावे लागणार आहे.
केंद्राचीही मंजुरी मिळणे आवश्यक
राष्ट्रीय महामार्गाबरोबरच राष्ट्रीय उपमहामार्गांना फ्लायओव्हर रस्ता जोडण्यासाठी केंद्र सरकारचीही मंजुरी मिळणे महत्त्वाचे आहे. राज्य सरकारला अंतर्गत इतका खर्च करणे परवडणारे नाही. त्यामुळे पालकमंत्री सतीश जारकीहोळी कर्नाटक सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे पाठपुरावा करणार आहेत काय, हे देखील पाहावे लागणार आहे. पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा मात्र पल्लवित झाल्या आहेत.









