दरवाढ मागे घेण्याची मागणी : विविध संघटनांकडून निवेदन
बेळगाव : भरमसाट वीजदरवाढीविरोधात बेळगावमधील विविध संघटनांनी सोमवारी नेहरुनगर येथील हेस्काम कार्यालयासमोर आंदोलन करत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. वीजदरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शिवाय उद्योग, व्यापार क्षेत्रालाही मोठा दणका बसला आहे. त्यामुळे विविध संघटनांनी या दरवाढीला कडाडून विरोध दर्शवून ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी हेस्कॉमचे मुख्य अभियंता प्रकाश यांची भेट घेतली. 50 ते 60 टक्के दरवाढ केल्याने बिल भरणे अशक्य झाले आहे. याचा परिणाम आता इतर वस्तू व सेवांवर होणार असल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हेस्कॉमने ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले, सूरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, पुंडलिक पावशे, बी. डी. मोहनगेकर, निंगाप्पा जाधव, आशिष कोचेरी, अजित कोकणे यासह इतर सदस्य उपस्थित होते. हेस्कॉम अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन पाठवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
ह्युमन राईट्स संघटनेचे धरणे आंदोलन
एकीकडे राज्य सरकार 200 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा करत असताना दुसरीकडे वाढीव वीजदराचा बोजा सर्वसामान्यांवर लादला जात आहे. 50 ते 60 टक्के वीजबिलामध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जोवर ही दरवाढ मागे घेतली जाणार नाही, तोवर वीजबिल भरणार नाही, असा पवित्रा ऑल इंडिया ह्युमन राईट्स अँड सोशल जस्टीस मिशनतर्फे घेण्यात आला. सोमवारी नेहऊनगर येथील हेस्कॉम कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत नागरिकांनी आपला विरोध दर्शविला. राज्यात दरवर्षी वीजदरवाढ केली जाते. परंतु, यावर्षी मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्यात आल्याने 500 ते 600 रुपये येणारे वीजबिल दोन हजाराकडे पोहोचले आहे. एकाच महिन्यात इतकी दरवाढ झाल्याने हे बिल भरणे सर्वसामान्यांसाठी अशक्य आहे. त्यामुळे ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम बनवानी, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी लेंगडे, सूरज काळे यासह इतर सदस्य उपस्थित होते.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन
हेस्कॉमकडून वीजदरवाढ करण्यात आल्याने वीजबिलात मोठी वाढ झाली आहे. विद्युत बिल भरमसाट आल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हेस्कॉमकडून ही दरवाढ करण्यात आली असून ती मागे घ्यावी, अशी मागणी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्यावतीने सोमवारी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना करण्यात आली. हेस्कॉमने केलेली दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा जायंट्स ग्रुपने दिला. यावेळी अध्यक्ष सुनील मुतगेकर, उपाध्यक्ष अविनाश पाटील, विजय बनसूर, मुकुंद महागावकर, भरत गावडे, अनिल चौगुले, आनंद कुलकर्णी, अजित कोकणे, पुंडलिक पावशे यासह इतर उपस्थित होते. यावेळी हेस्कॉमचे अधीक्षक अभियंता रमेश राठोड, साहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करुर यासह इतर उपस्थित होते.









