बेळगाव : संपूर्ण देशात वीर स्थितीतील शनि महाराजांची मूर्ती असणाऱ्या बेळगावच्या शनि मंदिरामध्ये शनैश्चर जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून रात्रीपर्यंत गर्दी केली होती. मंगळवारी सूर्योदयावेळी शनि महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर रुद्राभिषेक, पंचामृताभिषेक आणि तैलाभिषेक आदी विधी पार पडले. याशिवाय श्री शनि शांती, तीळहोम, श्री शनि रुद्रहोम, श्री शनि जप आदी धार्मिक विधी करण्यात आले. शनिदेवाच्या अलंकार सेवेनंतर महाआरती होऊन महानैवेद्य दाखविण्यात आला. पहाटेपासून दर्शनासाठी आलेल्या भक्तांना प्रसाद वितरित करण्यात आला.
दक्षिण भारतामध्ये या शनि मंदिराची ख्याती आहे. मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा येथूनही भाविक येतात. उज्जैन येथील पुजाऱ्यांनी या मूर्तीचे दर्शन घेतले तेव्हा अशा पद्धतीची मूर्ती देशात अन्यत्र कोठेही नसल्याचे त्यांनी सांगितले. हे देवस्थान जागृत म्हणून ओळखले जाते व कोणताही नवस येथे बोलल्यास तो फळाला जातो, अशी भाविकांची धारणा असल्याची माहिती संजीव अध्यापक यांनी दिली. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर शनि मंदिरमध्ये मंगळवारी भारतीय सैन्य दलाचे मनोबल वृद्धिंगत होवो, या हेतूने व विश्व कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. मंगळवारी सर्व विधी निरंजन अध्यापक यांच्या पौरोहित्याखाली पार पडले. दुपारी झालेल्या महाप्रसादाला भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.









