वृत्तसंस्था/ चेन्नई
2023-24 च्या इंडियन सुपर लिग फुटबॉल हंगामासाठी सर्बियाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लाझार सिरकोविचबरोबर चेन्नईन एफसी संघाने नुकताच नवा करार केला आहे.
आगामी इंडियन सुपर लिग फुटबॉल हंगामासाठी चेन्नईन एफसी संघाने आतापर्यंत पाच विदेशी फुटबॉलपटूंशी करार केला आहे. सिरकोविचच्या करारामुळे आता चेन्नईन एफसी संघाची बचावफळी अधिक भक्कम राहिल असे या संघाचे प्रमुख प्रशिक्षक ओवेन कॉयील यांनी सांगितले. यापुर्वी सिरकोविच हंगेरीतील बुडापेस्ट होनवेड फुटबॉल क्लबकडून खेळत असे. 2022-23 च्या हंगेरीयन फर्स्ट डिविजन फुटबॉल स्पर्धेत सिरकोविचने 17 सामन्यात बुडापेस्ट होनवेड क्लबचे प्रतिनिधीत्व केले आहे. हंगेरीयन फुटबॉल क्षेत्रातील सिरकोविच हा एक अनुभवी ज्येष्ट फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. एफ के रॅड, एफ के पार्टिझन बेलग्रेड तसेच किसवेर्दा एफसी क्लबकडून सिरकोविचने सर्बियाच्या फर्स्ट डिविजन फुटबॉल स्पर्धेत 146 सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. 31 वर्षीय सिरकोविचने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर आपल्या यापूर्वीच्या क्लबला दोनवेळा सर्बियन फुटबॉल चषक स्पर्धा जिंकून दिली होती. युफा, युरोपा लिग फुटबॉल स्पध्xात सिरकोविचने 8 सामने खेळले आहेत. 2023-24 च्या इंडियन सुपरलिग फुटबॉल हंगामातील चेन्नईन एफसी संघाचा सलामीचा सामना ओडिशा एफसी संघाबरोबर येत्या शनिवारी भुवनेश्वरमध्ये खेळवला जाणार आहे.









