वृत्तसंस्था / नवी दिल्ली
फ्लिपकार्ट आणि फोन पे यांनी अखेर वेगवेगळे होण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अर्थात दोन्ही कंपन्या अमेरिकेतील वॉलमार्ट या कंपनीच्या अंतर्गतच काम पाहणार आहेत, असेही सांगितले जात आहे. फ्लिपकार्ट समूहाने 2016 मध्ये फोन पेचे अधिग्रहण केले होते.
देवाण-घेवाणीच्या या व्यवहारांतर्गत वॉलमार्टअंतर्गत येणाऱया फ्लिपकार्ट सिंगापूर आणि फोन पे सिंगापूर यांच्यातील सध्याच्या भागधारकांनी फोन पे इंडियामधील समभाग खरेदी केले आहेत. यामुळे फोन पे आता पूर्णपणे भारतीय कंपनी बनलेली आहे. ही प्रक्रिया गेल्या वषी सुरुवातीच्या काळामध्ये सुरू झाली होती. वॉलमार्टचा मात्र दोन्ही व्यवसाय समूहांमध्ये मोठा वाटा कायम राहणार आहे.
काय म्हणाले फोन पेचे संस्थापक
फोन पे चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ समीर निगम यांनी सांगितले की, आम्ही आता आमच्या व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत. यामध्ये विमा व्यवसाय, स्थावर मालमत्ता व्यवस्थापन आणि कर्ज देण्यासंदर्भातल्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करणार आहोत. याचबरोबर आम्ही देशामध्ये यूपीआय व्यवसायाच्या वृद्धीसाठीही आगामी काळामध्ये प्रयत्न करणार आहोत.









