जम्मू / वृत्तसंस्था
जम्मूच्या राजौरी भागातील डांगरी येथे सलग दुसऱया दिवशी आणखी एका दहशतवादी हल्ला झाला असून त्यात एका बालिका ठार झाली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. रविवारी याच ठिकाणी झालेल्या बॉबस्फोटात चार नागरीक ठार झाले होते. सोमवारी एका घरात हा अशाच प्रकारे स्फोट झाला. त्यात एक बालिका ठार आणि पाच व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
डांगरी येथे रविवारच्या दहशतवादी हल्ल्यात हिंदू नागरीकांचा बळी पडला होता. या हल्ल्याच्या विरोधात येथे मोठय़ा प्रमाणात नागरीकांची निदर्शने होत आहेत. ही निदर्शने संपल्यानंतर काही वेळातच नवा स्फोट झाला. पाठोपाठ घडणाऱया या घटनांमुळे या भागात प्रशासनाने अधिक पोलिस नियुक्त केले आहेत. तसेच घराघरांमधून झडती घेऊन शस्त्रास्त्रे आणि बाँब शोधण्याचे अभियान पोलीसांनी हाती घेतले आहे. मिश्र वस्तीतील हिंदू घरांवर बाँब टाकले गेल्याचे दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी स्वतः येऊन आमच्याशी संवाद साधावा अशी मागणी निदर्शकांनी केली होती.
श्रीनगरमध्येही स्फोट
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथेही एका दाट लोकवस्तीच्या भागात केंद्रीय राखीव पोलीसदलाच्या एका वाहनावर बाँब फेकण्यात आले आहेत. तर दक्षिण काश्मीरच्या राजपोरा विभागात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका सैनिकाची रायफल हिसकावण्याची घटना घडली. मात्र, रायफल ज्या इरफान बशीर याने हिसकावली होती, त्याला त्याचेच कुटुंबिय पोलीस स्थानकात घेऊन आले आणि त्यांनी रायफल पोलिसांना परत केली, असे वृत्त आहे.









