ख्रिश्चन-मुस्लीम ट्रस्टच्या शाळांचा विरोध
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमध्ये एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेल्या मुख्य हिस्स्याला (मुघल इतिहास, गुजरात दंगली आणि डार्विनचा सिद्धात) पुन्हा शिकविण्यावरुन नवा विरोधाभास निर्माण झाला आहे. केरळमध्ये पुरवणी पाठ्यापुस्तकांद्वारे हे धडे शिकविण्यात येतील, विद्यार्थ्यांना याचे अध्ययन अनिवार्य केले जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी मागील आठवड्यात केली होती.
डाव्या सरकारच्या या निर्णयाला आता ख्रिश्चन अन् मुस्लीम समुदायाने विरोध दर्शविला आहे. दोन्ही समुदायांचा विरोध पाहता राज्य सरकार आता या पुरवणी पाठ्यापुस्तकांना लागू करण्यावर पुनर्विचार करत आहे. केरळमध्ये बहुतांश शाळा ख्रिश्न अन् मुस्लीम व्यवस्थापनाच्या अंतर्गत येतात. या शाळांना मुघल इतिहास अन् गुजरात दंगलीविषयी शिकविण्यास काहीच आक्षेप नाही, परंतु त्यांना डार्विनच्या सिद्धांताबद्दल गंभीर समस्या आहे.
अभ्यासक्रमाच्या मुद्द्यावरून आता ख्रिश्चन अन् मुस्लीम समुदायांना भाजप-संघाची अप्रत्यक्ष स्वरुपात साथ मिळत असल्याचे चित्र आहे. भाजप अन् संघाने पुरवणी पाठ्यापुस्तकांद्वारे मुघलांचा इतिहास अन् गुजरात दंगलीविषयीच्या धड्यांना विरोध दर्शविला आहे. तर केरळ कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्सने (केसीबीसी) देखील डार्विनचा सिद्धांत युक्त पुरवणी पाठ्यापुस्तकाविरोधात भूमिका मांडली आहे.

1959 मध्ये आंदोलन
डार्विन सिद्धांतावरील आक्षेप नवी गोष्ट नाही. 1957 मध्ये केरळमध्ये पहिल्यांदा डावे पक्ष सत्तेवर आले होते, तेव्हा ख्रिश्चन अन् मुस्लीम दोन्ही समुदायांनी माकप अन् भाकपवर शालेय अभ्यासक्रमाद्वारे नास्तिकतेचा प्रचार करण्याचा आरोप केला होता. 1959 मध्ये या समुदायांनी डाव्या सरकारच्या शैक्षणिक धोरणांच्या विरोधात ‘मुक्ती संघर्ष’ आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळेच तत्कालीन जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने केरळमधील डाव्या पक्षांचे सरकार बरखास्त केले होते.
शाळा व्यवस्थापनांची भूमिका
अनेक शाळांच्या व्यवस्थापनांनी स्वत:च्या शाळांमध्ये डार्विन सिद्धांत शिकविला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. डार्विनचा सिद्धांत शिकविण्यास दीर्घकाळापासून शाळेच्या व्यवस्थापनाकडून मनाई केली जाते. शिक्षक देखील हा धडा शिकवत नाहीत आणि विद्यार्थ्यांनीच तो समजून घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
मुख्यमंत्र्यांचे मौन
डाव्या पक्षांनी मतपेढीला नुकसान पोहोचण्याच्या भीतीपोटी या मुद्द्यावर मौन साधले आहे. तर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी देखील याप्रकरणी वाढत्या विरोधामुळे मौन धारण केले आहे. परंतु महात्मा गांधी यांच्या हत्येसंबंधीचा मजकूर हटविणे आणि संघावरील बंदीचा मुद्दा वगळण्याप्रकरणी विजयन यांनी मात्र आवाज उठविला होता. केरळ घटनात्मक आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांना महत्त्व देत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
थेअरी ऑफ इव्होल्युशन
24 नोव्हेंबर 1859 रोजी चार्ल्स डार्विन यांचे पुस्तक ‘ऑन द ओरिजिन ऑफ स्पेशीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन’ प्रकाशित झाले होते. या पुस्तकात ‘थेअरी ऑफ इव्होल्युशन’ हा भाग सामील होता. यात माकड हे माणसाचे पूर्वज असल्याचा दावा करण्यात आला होता.









