स्पधेतील सर्वात धक्कादायक निकाल, 2-1 फरकाने सौदी अरेबिया विजयी
वृत्तसंस्था/ लुसेल, कतार
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सर्वात धक्कादायक निकालापैकी एक ठरलेल्या सामन्यात सौरी अरेबिया या आशियाई देशाने बलाढय़ व संभाव्य विजेत्या मानल्या जाणाऱया अर्जेन्टिनाला 2-1 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का देत सनसनाटी निर्माण केली.
स्टार फुटबॉलपटू लायोनेल मेस्सीची ही पाचवी विश्वचषक स्पर्धा असून त्याला आजवर जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. ही कसर भरून काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या मेस्सीला अर्जेन्टिना संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाच्या धक्क्याला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे 1990 मधील पराभवाच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यावर्षी दिएगो माराडोनाच्या अर्जेन्टिना संघाला कॅमेरूनकडून पहिल्याच सामन्यात 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. येथील सामन्यात सौदीचे गोल सालेह अल शेहरी (48 वे मिनिट) व सालेम अल दासरी (53) यांनी उत्तरार्धात पाच मिनिटांच्या फरकाने नोंदवले. पूर्वार्धात दहाव्या मिनिटाला मेस्सीने पेनल्टीवर गोल नोंदवून अर्जेन्टिनाला आघाडी मिळवून दिली होती.

यापूर्वीही असेच धक्कादायक निकाल पहावयास मिळाले आहेत. 2002 मधील स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात विद्यमान विजेत्या फ्रान्सला सेनेगलने 1-0 असा धक्का दिला होता तर त्याआधी 1950 मध्ये अमेरिकेने इंग्लंडचा याच गोलफरकाने चकित केले होते.
येथील पराभवामुळे अर्जेन्टिनाची 36 सामन्यांची अपराजित घोडदौड रोखली गेली. पराभवानंतर निराश झालेल्या मेस्सीने सौदी अरेबियाच्या कोचिंग स्टाफशी हस्तांदोलन केले आणि सेंटर सर्कलवर कमरेवर हात ठेवत निराश अवस्थेत उभा राहिला. फुटबॉलमधील एक सर्वात बडा खेळाडू असलेल्या मेस्सीचे हे दृष्य याआधी अनेकदा पहावयास मिळाले आहे. यापूर्वी चार विश्वचषकात त्याने भाग घेतलाय, पण त्याला हे सर्वात मोठे इनाम अद्याप मिळविता आलेले नाही. त्यासाठी यावेळी तो प्रयत्नांची शिकस्त करेल, यात शंकाच नाही. पण पहिलाच सामना गमविल्यामुळे आता उर्वरित दोन सामने त्यांना जिंकण्यावाचून पर्याय राहिला नाही.
अल दासरीचा गोल ठरला निर्णायक
अर्जेन्टिनावर अविश्वसनीय विजय मिळविल्यानंतर अल दासरीने सॉमरसॉल्ट उडी घेत आनंद साजरा केला. त्यानेच 53 व्या मिनिटाला पेनल्टी क्षेत्रातून जोरदार फटक्यावर विजयी गोल नोंदवला. उंचावरून मिळालेल्या चेंडूला खाली घेतल्यावर त्याने एका डिफेंडरला चुकवले आणि आणखी एकाला हुलकावणी देत एका जबरदस्त ड्राईव्हवर चेंडू जाळय़ात मारला. गोलरक्षक एमि मार्टिनेझच्या हाताचा चेंडूला स्पर्श झाला. पण तो चेंडू गोलपासून दूर नेऊ शकला नाही. या गोलनंतर मेस्सी सुन्न होऊन, आघाडीच्या गोलने चकित झालेल्या सौदीच्या चाहत्यांचा जल्लोष पाहतच राहिला. यावेळी सौदीच्या बदली खेळाडूंनी मैदानात धाव घेतली होती.
सौदीच्या सौद अब्दुलहमिदने अर्जेन्टिनाचा मिडफिल्डर लियान्दो पॅरेडेसच्या शर्ट ओढल्याने व्हीएआरमार्फत अर्जेन्टिनाला दहाव्या मिनिटाला पेनल्टी मिळाली होती. त्यावरे मेस्सीने गोल नोंदवून अज्sा&न्टिनाला आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे तो चार वर्ल्डकपमध्ये गोल नोंदवणारा अर्जेन्टिनाचा पहिला फुटबॉलपटू बनला आहे. पण त्यानंतर 48 व्या मिनिटाला सालेह अल शेहरीने डिफेंडर किस्टियन रॉमेरोच्या पायामधून अँग्युलर फटक्यावर गोल नोंदवत सौदीला बरोबरी साधून दिली आणि 53 व्या मिनिटाला अल दासरीने निर्णायक गोल नोंदवत सौदीला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. अर्जेन्टिनाला आता मेक्सिको व पोलंडविरुद्धचे सामने जिंकावे लागणार आहेत.
आजचे सामने
1) मोरोक्को वि. क्रोएशिया
वेळ ः दुपारी 3.30 वा.
2) जपान वि. जर्मनी
वेळ ः सायंकाळी 6.30 वा.
3) स्पेन वि. कोस्टारिका
वेळ ः रात्री 9.30 वा.
4) बेल्जियम वि. कॅनडा
वेळ ः मध्यरात्री 12.30 वा.
थेट प्रक्षेपण ः स्पोर्ट्स 18
लाईव्ह स्ट्रीमिंग ः जिओसिनेमा









