नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मनी लाँड्रिंगप्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ते तिहार कारागृहाचे अधीक्षक अजित कुमार यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. भाजप नेते हरीश खुराणा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यापूर्वी गेल्या आठवडय़ात त्यांचे मसाज आणि जेवण करतानाचे तीन व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते.
आता सोशल मीडियावर नव्याने व्हायरल करण्यात आलेला व्हिडिओ 12 सप्टेंबर 2022 चा आहे. या व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन तीन जणांसोबत बसलेले दिसत आहेत. काही वेळाने तिघेही उठून निघून जातात आणि तुरुंग अधीक्षक अजित कुमार तिथे येत खुर्चीवर बसतात. यादरम्यान जैन पलंगावर पडून आहेत. दोघांमध्ये काही गोष्टीवरून चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. भाजप नेते खुराणा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला “कारागृह मंत्र्यांच्या दरबारात रात्री 8 वाजता हजेरी देताना कारागृह अधीक्षक…’’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
विशेष सुविधा दिल्याबद्दल अधीक्षकांना हटवले
सत्येंद्र जैन यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी तिहार तुरुंगातील बॅरेक क्रमांक 7 चे अधीक्षक अजित कुमार यांना 14 नोव्हेंबर रोजी निलंबित करण्यात आले होते. याच्या 10 दिवसांपूर्वी म्हणजेच 4 नोव्हेंबरला तिहारचे डीजी संदीप गोयल यांना हटवून त्यांच्या जागी संजय बेनिवाल यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यावर तिहारमधील आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून 10 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. त्यांच्यासह अन्य काही कर्मचाऱयांनाही काढून टाकण्यात आले आहे.
जैन यांना विशेष भोजन नाकारले
दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने शनिवारी सत्येंद्र जैन यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करत कारागृहामध्ये विशेष जेवणाची मागणी केली होती. जैन यांनी कारागृहात सुका मेवा आणि फळांची मागणीही केली होती. तथापि, त्यांची ही याचिका फेटाळून लावत विशेष भोजन देण्यास नकार दर्शवला आहे. चार दिवसांपूर्वीच भाजपने बुधवारी सोशल मीडियावर सुमारे दीड मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात सत्येंद्र जैन स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. तसेच ते कारागृह कक्षामध्ये जेवत असून एक व्यक्ती सतत त्यांच्या सेवेत गुंतलेली दिसत होती.
अंमलबजावणी संचालनालयाने 31 मे 2022 रोजी जैन यांना मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. तेव्हापासून जैन तिहार कारागृहामध्ये बंद आहेत. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला असला तरी 5 महिन्यांत एकदाही त्यांना जामीन मिळालेला नाही. जैन यांच्या कारागृहातील बडदास्तीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात धाव घेत यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला आहे. जैन यांच्या जेवणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली आहे. हवालाबाजांना तुरुंगात कोणताही त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी केजरीवाल यांनी घेतल्याचेही भाजपने म्हटले आहे. 19 नोव्हेंबर रोजी प्रसारमाध्यमांमध्ये जैन यांचा कारागृहात मसाज केले जात असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये सत्येंद्र जैन तिहारमध्ये मसाज करून घेताना दिसत होते. भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला होता.









