आगामी आठ-नऊ महिने हा निवडणूक काळ आहे. काही राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका आहेत, तर येत्या एप्रिल-मे मध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे. ही लोकसभेची निवडणूक सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. केंद्रातील सत्तेपासून विरोधक गेली जवळपास दहा वर्षे वंचित आहेत. त्यामुळे, कधी एकदा आपण सत्तेवर येतो, असे त्यांना झाले असल्यास आश्चर्य नाही. मग यासाठी आता विविध मुद्द्यांची शोधाशोध होत आहे. वास्तविक, महागाई, बेरोजगारी इत्यादी देशाच्या पाचवीला फार पूर्वीपासून पुजलेले मुद्दे आहेत. तथापि, सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांची पंचाईत अशी आहे, की ते जेव्हा केंद्रात सत्तेवर होते, तेव्हाही हे मुद्दे आज आहेत तितकेच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तीव्र होते. त्यामुळे ‘तुमच्या काळातही महागाई मोठ्या प्रमाणात होती, बेरोजगारीही होती,’ त्यावेळी तुम्ही मिठाची गुळणी का धरली होती? असा प्रश्न सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून किंवा जनतेकडूनही विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे मुद्दे निवडणूक जिंकण्यासाठी कितपत उपयोगी पडतील, याची विरोधकांना शाश्वती वाटत नसावी. म्हणून काही जुन्या मुद्द्यांना उजाळा दिला जात आहे. तसा एक मुद्दा विरोधकांना नव्याने गवसला आहे. ‘सनातन धर्म’विरोध असे या मुद्द्याचे नाव आहे. खरेतर सनातन धर्म जितका जुना आहे, तितकाच हा विरोधही जुनाच आहे. त्यात नाविन्य काही नाही. पण काहीवेळा विसरल्या गेलेल्या फॅशन्स नव्याने आणून आपण फॅशनच्या क्षेत्रात मोठी क्रांती केली, असा टेंभा मिरविण्याचा काही जणांचा प्रयत्न असतो. तसा प्रयत्न सनातन धर्माच्या संदर्भात आज होताना दिसत आहे. सनातन धर्म म्हणजे कोरोना, हिंवताप, डेंग्यू इत्यादींच्या विषाणूंसारखा असून तो नष्ट करण्यात आला पाहिजे, अशी भाषा काही राजकीय नेत्यांकडून होऊ लागली आहे. सनातन धर्म भेदभावपूर्ण आहे. तो महिलांवर अन्याय करणारा आहे, समाजात फूट पाडणारा आहे, इत्यादी साक्षात्कारही काही राजकीय नेत्यांना निवडणूक जवळ येईल तसतसे नव्याने होऊ लागलेले दिसतात. यावर अनेकांनी अनेक बाबी आतापर्यंत लिहिल्या आहेत किंवा त्यांच्यावर चर्चा झडल्या आहेत. तथापि, वाद हेतुपुरस्सर सुरुच ठेवला गेल्याने त्याची पुन्हा दखल घेणे क्रमप्राप्त आहे. सनातन धर्म म्हणजे नेमके काय हे बहुतेकवेळा त्याच्या विरोधकांना माहित नसते. इतकेच नव्हे, तर या धर्माला विरोध करत असताना ते स्वत:ची वर्तणूक कशी आहे, हे पडताळण्याचे भानही ठेवत नाहीत. उदाहरणार्थ, योग्यता असताना किंवा नसतानाही पित्याची राजकीय ‘गादी’ पुत्राने चालविणे, त्यानंतर तीच गादी पुत्राच्या किंवा त्याच्याही पुत्राच्या पुत्राने चालविणे असे सनातनत्व हे नेतेही मानतात. त्यांच्या राजकीय पक्षांमध्ये महिलांना किती प्रमाणात आणि कोणते मानाचे स्थान मिळते हे सर्वांना माहित आहेच. सनातन ‘धर्मा’ला कडाडून विरोध करुन शाब्दिक सामाजिक क्रांती घडविण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे बहुतेक राजकीय नेते हे त्यांचे सनातनत्व मात्र, प्राणपणाने जपताना दिसून येतात. आज ज्या राजकीय नेत्यांनी सनातन धर्मावर आघात चालविलेले आहेत, ते नेते असेच कर्तृत्व सिद्ध करुन नव्हे, तर बापजाद्यांच्या पुण्याईवर मंत्रिपदे प्राप्त केलेले नाहीत काय? कोणाचे आजोबा मुख्यमंत्री होते. कोणाचे वडील मुख्यमंत्री होते आणि आहेत. कोणाचे वडील किंवा आजोबा किंवा पणजोबा किंवा आजी देशाच्या पंतप्रधानपदारवही होते. तेव्हा अशा पदांची अपेक्षा न बाळगता किंवा अशी सनातनी पद्धतीने वारशाने मिळालेली पदे सोडून देऊन, सनातन धर्माला विरोध करणारे किती नेते आहेत? हाताच्या बोटावर मोजण्याइतके देखील सापडणार नाहीत. याचाच अर्थ असा की सनातन धर्म किंवा सनातन परंपरा यांच्यातील आपल्याला सोयीचा भाग स्वीकारुन, तो जपून ठेवून आपल्याला राजकीयदृष्ट्या नको असलेल्या भागाला मात्र, जोरदार विरोध करण्याचे त्यांचे धोरण दिसते. याला सर्वसामान्य भाषेत ‘दांभिकता’ असे म्हणतात. राजकीय सत्तास्थान ही जणू आपली वडिलोपार्जित मालमत्ता आहे. ती आपल्या पूर्वजांच्या नंतर आपल्याच वाट्याला आली पाहिजे, ही ‘सनातनी’ मनोवृत्ती या आधुनिक क्रांतीकारकांना सोडता येत नाही. म्हणजेच, सनातन धर्माला त्यांनी सनातनी पद्धतीनेच विरोध चालवला आहे, असे म्हणावे लागते. ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडा पाषाण’ या म्हणीचे प्रत्यंतर घडविणारा हा विरोध आहे. या विरोधाची उबळ कोणतीही महत्त्वाची निवडणूक जवळ आली की उफाळून येते, हे देखील उघडे गुपित आहे. उलट बाजूने पाहताना, ज्या पक्षांवर किंवा संस्थांवर किंवा संघटनांवर ‘सनातनत्वा’चा आरोप केला जातो, त्यांच्यात मात्र, अशी सनातनी घराणेशाही फारशी आढळत नाही. घराणेशाहीचे सनातनत्व बाजूला ठेवले तरी इतर बाबींमध्येही हे टीकाकार कुठे नवविचारांनी भारलेले असतात? त्यांची समाजाशी वागण्याची पद्धत, त्यांची आर्थिक धोरणे, स्वयंकेंद्री स्वभाव, निवडणूक लढविण्याची पद्धत, राजकीय धोरणे, आपल्या राजकीय किंवा अन्य क्षेत्रांमधील विरोधकांना नामोहरम करण्याच्या पद्धती, आडाखे, डावपेच, कारस्थाने, भ्रष्टाचार हे विचारात घेतले तर असे दिसते की, जे दोष या मंडळींना सनातन धर्मात दिसतात त्याच दोषांनी हे लोकही ओतप्रोत भरलेले आहेत. तरीही यांचा सनातन धर्माला विरोध असतो. ही मोठीच गंमत आहे. तरीही हा ‘घरबसल्या क्रांती’ करण्याचा मोह टाळता येत नाही. या नवक्रांतीकारकांमध्ये एकमत आहे असे म्हणावे तर तसेही दिसत नाही. कारण, सनातन धर्मावर अश्लाघ्य भाषेत आगपाखड काहींनी करताच, त्यांच्याच गोटातील किंवा गटातील इतर अनेक जण, आम्ही असे म्हणत नाही, हे काही जणांचे खासगी मत आहे, त्याला महत्त्व देऊ नये, अशी सारवासारवी करत विश्वामित्री पवित्रा धारण करतात, हा आणखी मोठा विनोद आहे. या साऱ्यांना एवढेच सांगावेसे वाटते की, सनातन धर्माला विरोधापेक्षा स्वत:मधील ‘सनातनी’ आणि ‘स्वार्थी’ मनोवृत्ती नष्ट करणे आवश्यक आहे. पण ऐकतो कोण?
Previous Articleपाऊस कमजोर तर मंत्री शिरजोर
Next Article श्रावणात घननिळा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








