अग्निवीर प्रशिक्षणार्थ्यांची पहिली तुकडी दाखल : 30 डिसेंबरपासून प्रशिक्षणाला प्रारंभ : एअरमन स्कूलमध्ये अधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन

प्रतिनिधी /बेळगाव
देशात प्रथमच लागू करण्यात आलेल्या अग्निवीर योजनेंतर्गत अग्निवीर प्रशिक्षणासाठी सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्निवीर प्रशिक्षणार्थ्यांची पहिली तुकडी रविवारी दाखल झाली. सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल ही देशातील नामवंत प्रशिक्षण संस्था असून दि. 30 डिसेंबरपासून अग्निवीरांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ होणार आहे.
सहा महिने त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून एअरमन स्कूल येथे एकूण 2 हजार 850 जणांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर चार वर्षे ते हवाई दलातील विविध विभागात काम करतील. चार वर्षांनंतर प्रशिक्षणाच्या कसोटीवर पुरेपूर उतरलेल्या 25 टक्के अग्निवीरांना पुन्हा सेवेत सामावून घेतले जाईल व अन्य अग्निवीरांना हवाई दलातून बाहेरील जगात काम करण्यासाठी स्वातंत्र्य असेल.

याच निमित्ताने सर्व प्रसारमाध्यमांसाठी एअरमन स्कूल येथे रविवारी विशेष भेटीचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्या पद्धतीने अग्निवीरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, याची माहिती यावेळी देण्यात आली. स्टेशनचे पीआरओ स्क्वॉड्रन लिडर कुणाल यांनी प्रसार माध्यमांसमवेत हा दौरा पूर्ण केला.
रविवारी पहाटे सर्व अग्निवीरांना खास वाहन सुविधा उपलब्ध करून देऊन रेल्वेस्थानकावरून एअरमन स्कूल येथे आणण्यात आले. त्यांच्या सामानासाठी स्वतंत्र वाहनाची सोय करण्यात आली. परेड ग्राऊंडवर सर्व अग्निवीरांची कागदपत्रे तपासून एक्स-रे मशीनद्वारे त्यांची चाचणी करून बाहेर सोडण्यात आले. रविवारी एकूण 800 अग्निवीर दाखल झाले.

एअरमन स्कूल येथील परेड ग्राऊंडवर पहाटे कवायती आणि व्यायाम होतील. त्यानंतर अॅबस्टॅकल्स म्हणजे अडथळ्यांच्या कसरती त्यांना कराव्या लागतील. यामध्ये दोरीवरचे व्यायाम, उंच उडी यासह अन्य कसरतींचा समावेश असणार आहे. एअरमन स्कूल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाशी साधर्म्य साधणारे जिम्नॅस्टिक असून येथील क्रीडापटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकदार कामगिरी बजावली आहे. रेफ्री राव हे या ठिकाणी प्रशिक्षण देत आहेत. तसेच येथे सुसज्ज असा जलतरण तलावही आहे.
सर्व अग्निवीरांच्या निवासाची सोय थाऊजंड ट्रेनिंग विलेट येथे करण्यात आली आहे. कात्रे, मुजुमदार, लाल, लतिफ, मेहेक, सुब्रतो असे एकूण सहा हाऊस असून तेथे अग्निवीरांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. दररोज रात्री सर्वांची हजेरी घेऊन दुसऱ्या दिवशीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. जेणेकरून प्रशिक्षणार्थींना त्यादृष्टीने तयार करता येईल. याच ठिकाणी असलेल्या स्वतंत्र भोजन कक्षात अग्निवीर आणि सर्वच प्रशिक्षणार्थींच्या भोजनाची व्यवस्था तेथे लावण्यात आलेल्या कॅलरीजच्या चार्टनुसारच केली जाते.
येथेच असणाऱ्या केटरिंग विभागामध्ये
हॉटेल मॅनेजमेंटनुसार शेफना प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्यांच्यासाठी विविध स्पर्धाही घेतल्या जातात. एअरमन स्कूलमध्ये सातत्याने देशाच्या विविध भागांतून हवाई दलातील अधिकारी येत असतात. त्यांना आणि प्रशिक्षणार्थींना सर्व जिन्नस आणि फळफळावळे नेमक्या पद्धतीने समजावीत, यासाठी दोन काचेच्या पेट्यांमध्ये प्रत्येक डाळी आणि धान्यांची तसेच फळांची नावे व मसाल्याच्या जिन्नसांची नावे लिहिण्यात आली आहेत. याच ठिकाणी टेबल मॅनर्स आणि एटीकेट्स याचेही प्रशिक्षण दिले जाते.
एकूणच अग्निवीर आणि हवाई दलामध्ये सेवा करू पाहणाऱ्या सर्वच नवोदित तरुणाईसाठी सांबरा एअरमन स्कूल ही उत्तम व नावाजलेली संस्था आहे. येथे सातत्याने प्रशिक्षण देण्यात येते, याची प्रचिती वारंवार दिसून येते.
25 टक्के प्रशिक्षणार्थींना पुन्हा संधी

सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे पहिल्या तुकडीच्या अग्निवीरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा आमच्यासाठी ऐतिहासिक असा क्षण आहे. अग्निवीर योजना नव्याने सुरू करण्यात आल्याने प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम यातही बदल करण्यात आला आहे. सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा अत्युत्तम कामगिरी करणाऱ्या 25 टक्के प्रशिक्षणार्थींना हवाई दलात काम करण्याची संधी दिली जाईल, अशी माहिती एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी दिली. अर्थात अन्य प्रशिक्षणार्थींना पुन्हा बाहेरच्या जगात जाऊन काम करावे लागेल. मात्र, त्यांना शिस्त, वेळेचे महत्त्व समजल्याने आणि प्रशिक्षण मिळाल्याने त्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. अग्निवीरांना शारीरिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पण त्यांचे मनोबल अखंड राहावे, यासाठी सुविधा आहे का? या प्रश्नावर ‘बडी रोल’ अशी एक संकल्पना असून अग्निवीर परस्परांमध्ये संवाद साधतील, त्यांच्यावर एक स्क्वॉड्रन कमांडर असेल. प्रशिक्षण पूर्ण केलेले समुपदेशक असतील, ज्यांची मदत अग्निवीरांना होईल. अर्थात त्यातूनही एखाद्याने परत जायचेच ठरविले तर आम्ही त्याला अडवू शकत नाही, असे ते म्हणाले.
– सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलचे एअर कमोडोर एस. श्रीधर (व्ही. एम., एअर ऑफिसर कमांडिंग)
युवतींना जुलैपासून प्रशिक्षण…
जूनपर्यंत युवक अग्निवीरांचे प्रशिक्षण पूर्ण होणार असून जुलैपासून अग्निवीर युवतींना प्रशिक्षण दिले जाईल. त्यांच्यासाठी एअरमन स्कूल येथे नव्याने इमारत उभी होत आहे. याशिवाय अन्य सुविधाही लवकरच सुरू केल्या जात आहेत. ही विशेष बाब आहे.
– ग्रुप कॅप्टन अरुण मित्तल (व्हीएसएम, चीफ इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग)









