जागतिक बाजारात विक्रीचा परिणाम : निफ्टीही घसरणीसह बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील शेअर बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी दुसऱया सत्रातही सेन्सेक्स व निफ्टीत घसरणीचा कल राहिल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये विक्रीचा दबाव राहिला होता. यामध्ये आयटी, बँक आणि दैनंदिन वापरातील साहित्याची निर्मिती करणाऱया कंपन्यांच्या समभागांची विक्री झाल्याने सेन्सेक्स व निफ्टी यांचे दोन्ही निर्देशांक जवळपास 1 टक्क्यांनी घसरुन बंद झाल्याचे दिसून आले.
ट्रेडिंगच्या दरम्यान विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या विक्रीचा प्रवाह कायम राहिल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी पातळीवर निच्चांकी पातळीवर राहिल्याने बाजार प्रभावासह बंद झाले आहेत. गुंतवणूकदार किरकोळ चलनवाढ व औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीच्या प्रतीक्षेत असून या अगोदरच दबाव निर्माण झाल्याचे बाजारात घसरणीचे सत्र निर्माण झाले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 508.62 अंकांनी घसरुन निर्देशांक 53,886.61 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला 157.70 अंकांनी घसरुन निफ्टी निर्देशांक 16,058.30 वर बंद झाला.
सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 2.33 टक्के इतक्या घसरणीत इन्फोसिसचे समभाग राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया, पॉवरग्रिड कॉर्प, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एचसीएल टेक आणि कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला एनटीपीसी, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांचे समभाग मात्र 1.87 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत.
विविध घडामोडींपैकी किरकोळ महागाई दराचे आकडे सादर होण्याअगोदर जागतिक बाजारातील व्याजदर पुन्हा वाढण्याच्या भितीमुळे चलनवाढीतील दबावासोबत अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह आक्रमकपणे पुन्हा व्याजदर वाढविण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.









