वृत्तसंस्था/ दुबई
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने रोहित शर्मा हा भारताला 2011 च्या विजयानंतर मायदेशातींल दुसरे, तर एकंदरित तिसरे एकदिवसीय विश्वचषक जेतेपद मिळवून देण्यास आदर्श कर्णधार असल्याचे मत व्यक्त केले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने तीन विजयांसह विश्वचषक मोहिमेची चांगली सुऊवात केली आहे.
भारताने त्यांच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला. त्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवर अनुक्रमे आठ आणि सात गडी राखून विजय मिळवून गुणतालिकेत ते अव्वल स्थानावर विराजमान झाले आहेत. ‘रोहित खूप शांत असतो. तो प्रत्येक गोष्ट आरामात करतो. तो ज्या पद्धतीने खेळतो ते पाहिल्यास हे कळून येते. रोहित हा एक मितभाषी फलंदाज आहे आणि तो मैदानावर तसेच मैदानाबाहेरही तसाच असतो’, असे पाँटिंगने मंगळवारी ‘आयसीसी’शी बोलताना सांगितले.
रोहितने डिसेंबर, 2021 मध्ये विराट कोहलीकडून एकदिवसीय तसेच टी20 संघांच्या कर्णधारपदाची जबाबदारी घेतली. पाँटिंगच्या मते, रोहित त्यासाठी पूर्णपणे अनुरुप आहे आणि यामुळे कोहलीला त्याच्या फलंदाजीवर लक्ष पेंद्रीत करता येईल. ‘विराटसारखा खेळाडू हा कदाचित चाहत्यांचे ऐकतो आणि चाहत्यांसाठी जरा जास्तच खेळतो. त्याच्यासारख्या व्यक्तीला हे थोडे जड जाईल, पण मला वाटते की रोहित ही जबाबदारी सहज पेलत आहे. तो बऱ्याच काळापासून एक उत्कृष्ट खेळाडू राहिला आहे आणि भारतीय संघाचा कर्णधार म्हणूनही त्याने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे’, असे पाँटिंगने सांगितले.
2011 मध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी संयुक्तपणे विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते, तेव्हा भारतीय संघाने शेवटच्या खेपेला विश्वचषक जिंकला होता. घरच्या चाहत्यांसमोर कामगिरी करून दाखविण्याचे अतिरिक्त दडपण नक्कीच असेल, पण रोहित त्याला सामोरे जाण्यासाठी सर्वोत्कृष्ट व्यक्ती असल्याचे पाँटिंगला वाटते. “आम्ही असे म्हणू शकत नाही, की एखाद्या टप्प्यावर भारतावर दबाव येणार नाही किंवा त्याचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही. परंतु रोहित समोर येऊन त्याचा सामना करेल’, असे त्याने म्हटले आहे.
भारत हा सध्या चालू असलेल्या स्पर्धेतील पराभूत करण्यास सर्वांत कठीण संघ आहे. मी सुऊवातीपासूनच सांगितलेले आहे की, त्यांना पराभूत करणे कठीण राहील. भारताकडे खूप गुणवान खेळाडू आहेत. त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजी, फिरकी मारा आणि फलंदाजीत वरची फळी, मधली फळी आहे. त्यांना पराभूत करणे अत्यंत कठीण जाणार आहे. पण ते अत्यंत दडपणाखाली कसे टिकून राहतात तेही पाहावे लागेल, असे मत पाँटिंगने व्यक्त केले. भारताचा पुढील सामना गुऊवारी पुण्यात बांगलादेशशी होणार आहे.









