पंतप्रधान मोदींकडून महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची घोषणा : 2040 मध्ये चंद्रावर पाऊल
► वृत्तसंस्था / बेंगळूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या महत्त्वाकांक्षी अवकाश अभियान कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार 2025 मध्ये भारतीय अंतराळवीराचे अवकाशात उ•ाण होणार आहे. तसेच 2035 पर्यंत भारत आपले अंतराळस्थानक प्रक्षेपित करणार असून 2040 पर्यंत चंद्रावर आपल्या अंतराळवीरांची पावले पडणार आहेत. मंगळवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत गगनयान अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या कार्यक्रमाची घोषणा अवकाश संशोधकांच्या उपस्थितीत केली आहे.
या बैठकीत अवकाशसंशोधकांनी अवकाश विभागाच्या माध्यमातून गगनयान अभियानाचे सविस्तर सादरीकरण केले. यावेळी भारताच्या स्वदेशनिर्मित उच्च अवकाश तंत्रज्ञानाचेही सादरीकरण करण्यात आले. मानवसहित यान आणि व्यवस्था गुणवत्ता या तंत्रज्ञानांचा समावेश या सादरीकरणात होता.
20 परीक्षणे होणार
अवकाशात भारतीय अंतराळवीर जाण्यापूर्वी या अभियानाची 20 अतिमहत्त्वाची परीक्षणे केली जाणार आहेत. मानवयानाच्या तीन मानवरहित परीक्षणांचा त्यांच्यात समावेश आहे. मानवाला अवकाशात घेऊन जाण्याच्या गुणवत्तेचे यान निर्माण करण्यात आले असून त्याची परीक्षणे मानवरहित अवस्थेत होणार आहेत. त्याचप्रमाणे क्रू एस्केप व्यवस्थेचे परीक्षण केले जाणार आहे. 2025 मध्ये भारताचे पहिले मानवसहित यान अवकाशात झेपावणार आहे, असे निर्धारित करण्यात आले.
2035 पर्यंत अंतराळ स्थानक
अवकाश संशोधकांनी 2035 पर्यंत भारताच्या प्रथम अंतराळ स्थानकाचे अवकाशात प्रक्षेपण करावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच त्यानंतर पाच वर्षांमध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर आपले पाऊल ठेवेल अशी व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली. या बैठकीत चांद्रयान-3 आणि आदित्य एल 1 अभियानांसंबंधीही व्यापक चर्चा करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
इतर ग्रहांसंबंधीही अभियान
चंद्राच्या अभ्यासासमवेतच सूर्यमालेतील इतर ग्रहांवरही याने पाठविण्यासंबंधी या बैठकीत चर्चा करण्यात आली. शुक्र अभियान आणि मंगळ अभियानही आपले संशोधक हाती घेणार आहेत. चंद्राच्या अधिक अभ्यासासाठी आणखी चांद्रयान अभियाने हाती घेतली जाणार आहेत. तसेच पुढच्या पिढीतील प्रक्षेपण वाहनेही निर्माण करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा स्वदेशी विकास केला जाणार आहे.
यान परत येणार
प्रक्षेपित केलेले गगनयान विशिष्ट कालावधीनंतर पृथ्वीवर परतणार आहे. ते बंगालच्या उपसागरात येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हे परतण्याचे परीक्षण यशस्वी झाल्यास ती मानवाला अंतराळात सोडण्याच्या अभियानातील महत्त्वाची प्रगती ठरेल अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने दिली.
येत्या शनिवारी प्रथम परीक्षण
चंद्रावर मानवाला घेऊन जाणे, त्याआधी अंतराळ स्थानक अवकाशात धाडणे, या अभियानांच्याही आधी मोठ्या प्रमाणावर पूर्वतयारी केली जाणार आहे. येत्या शनिवारी, अर्थात 21 ऑक्टोबर या दिवशी भारत आपले प्रथम गगनयान प्रक्षेपित करणार आहे. हे अभियान व्हेईकल अॅबॉर्ट मिशन किंवा टीव्ही-डीएल 1 म्हणून ओळखले जात आहे. मानवाला अंतराळात घेऊन जाण्याच्या तयारीचा एक भाग म्हणून हे परीक्षण केले जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यात दाबविरहित क्रू मॉडेलचा उपयोग केला जाणार असून हे साधन इस्रोने विकसीत केलेले आहे. या साधनाचे यापूर्वीच सफल परीक्षण करण्यात आले आहे.









