कुस्तीपटू आरोप प्रकरणी ब्रिजभूषण सिंग यांचे वक्तव्य ः केजरीवाल, प्रियांका गांधी यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंनी शारिरीक शोषणाचा आरोप केला आहे. या संदर्भात प्रथमच सिंग यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही. चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. कुस्तीपटूंचे आंदोलन काँगेसने प्रायोजित केले असून ते खोटे आरोप करीत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
दिल्लीतील जंतरमंतर येथे महिला कुस्तीपटूंचे आंदोलन सुरुच आहे. शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँगेस नेत्या प्रियांका गांधी यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी कुस्तीपटू विनेश फोगट यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. ज्यांनी महिलांची छळवणूक केली आहे, त्यांना फासावर लटकविले पाहिजे, अशी मागणी या प्रसंगी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
सिंग यांची प्रतिक्रिया
सिंग यांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत एफआयआर सादर करण्यात आला आहे. त्यावेळी अल्पवयीन असणाऱया एका महिला कुस्तीपटूने त्यांच्यावर शारिरीक शोषणाचा आरोप केला आहे. त्यामुळे तिचे नाव गुप्त ठेवण्यात आले असून सिंग यांच्यावर दिल्ली पोलिसांनी तक्रार नोंद केली आहे. मात्र, सिंग यांनी सर्व आरोप नाकारले असून कुस्तीपटू अन्य कोणाच्या तरी प्रेरणेने बनावट आरोप करीत आहेत. चौकशीअंती सर्व सत्य बाहेर येईलच, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
राजकीय रंग
या प्रकरणाला जाणून बुजून राजकीय रंग देण्यात आला आहे. कुस्तीपटूंच्या मागण्या वारंवार बदलत आहेत. आपल्या विरोधातले शारिरीक शोषणाचे आरोप हे राजकीयदृष्टय़ा प्रेरित आहेत. आपल्याला आजवर कोणत्याही न्यायलयात शिक्षा झालेली नाही. कोणताही आरोप आपल्याविरोधात सिद्ध झालेला नाही. हे सर्व आपल्या बदनामीचे कारस्थान आहे, असे प्रत्यारोप सिंग यांनी केले.
कुस्तीपटूंचा पोलिसांवर आरोप
जंतरमंतरवर आंदोलन करणाऱया महिला कुस्तीपटूंनी पोलिसांवरही आरोप केले. पोलीस आमची कोंडी करीत आहेत. आंदोलनाच्या स्थानी आम्हाला अन्नपाणीही मिळू दिले जात नाही. आम्हाला विविध प्रकारे त्रास दिला जात आहे. पोलिसांकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
अटक करण्याची मागणी
सिंग यांना त्वरीत अध्यक्षपदावरुन हटवावे आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी केली. विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी या मागण्या अनेक दिवसांपासून लावून धरल्या आहेत. त्यांनी खाप पंचायत आणि राजकीय पक्षांकडूनही समर्थन मागितले आहे.
राजकीय पक्षांचा पाठिंबा
अनेक राजकीय पक्षांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यात काँगेस आणि आम आदमी पक्ष प्रामुख्याने आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱयांना त्वरित अटक करावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली असून कुस्तीपटूंना पूर्ण पाठिंबा दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काँगेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही कुस्तीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
दिवभरातील घडामोडी
ड जंतरमंतरवर महिला कुस्तीपटूंचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरुच
ड ब्रिजभूषण शरण सिंग यांना अटक करण्याची कुस्तीपटूंची मागणी









