राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची उपस्थिती
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयू) चा 13 वा दीक्षांत सोहळा शुक्रवार दि. 11 रोजी होणार आहे. सकाळी व्हीटीयूच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात समारंभ होईल. या कार्यक्रमाला राज्यपाल थावरचंद गेहलोत तसेच कर्नाटकचे उच्चशिक्षण मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर, मुंबई येथील सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीचे डीन पद्मश्री प्राध्यापक जी. एन. डेवी उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरु प्रा. सी. एम. त्यागराज यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील व्याप्तीने सर्वात मोठे विद्यापीठ म्हणून आरसीयूकडे पाहिले जाते. बेळगाव व विजापूर जिल्ह्यांतील 361 महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत. या अंतर्गत सुमारे 1 लाख 40 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हिरेबागेवाडी येथे 116 एकर जागेमध्ये आरसीयूच्या नव्या कॅम्पसचे काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गापासून विद्यापीठापर्यंत पोहोचण्यासाठी मोठे रस्ते केले जाणार आहेत. यासाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाणी तसेच इतर सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कुलगुरुंनी सांगितले.
यावर्षी तिघांना मानद डॉक्टरेट
पंचमश्री शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या कृषी, शिक्षण आणि समाजकार्यातील योगदानाबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट दिली जाणार आहे. कायदा क्षेत्रातील मुख्य न्यायाधीश एच. एन. नागमोहनदास तर शिक्षण व समाजकार्यासाठी शमसुद्दीन पुणेकर यांना मानद डॉक्टरेट दिली जाणार आहे. यावर्षी एकूण 20 विद्यार्थ्यांना पीएचडी दिली जाणार असून पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षी पदवी अभ्यासक्रमातील 46 हजार 013 तर पदव्युत्तर अभ्यासक्रमातील 2 हजार 866 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी रजिस्ट्रार संतोष कामगौडा, मूल्यमापन विभागाचे रजिस्ट्रार रवींद्रनाथ कदम, फायनान्स ऑफिसर एम. ए. सपना यासह इतर सदस्य उपस्थित होते.









