कोणाचाच अंकुश नसल्याने पर्यावरणप्रेमी संतप्त : निसर्गाबरोबरच जलपात्रालाही धोका
बेळगाव : जिल्ह्यात नद्यांच्या पाणीपातळीत घट होत असल्याने अवैधरित्या वाळू तस्करीचे प्रकार वाढले आहेत. नद्या आणि जलाशयाच्या बॅकवॉटर परिसरात नियमांची पायमल्ली करून वाळू उपसा केली जात आहे. अवैधरित्या वाळू उपसणाऱ्यांवर लगाम घालणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. हिडकल जलाशयाच्या बॅकवॉटर परिसरात बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे निसर्गाबरोबरच जलपात्रालाही धोका निर्माण झाला आहे. नदी, जलाशय, तलाव आणि वनक्षेत्र परिसरात वाळू आणि मातीचा उपसा करण्यास परवानगी नाही. मात्र बेकायदेशीरपणे नियमांचे उल्लंघन करून वाळूचा उपसा केला जात आहे. अशा प्रकारावर कोणाचा अंकुश नसल्याने पर्यावरण प्रेमीतून नाराजी व्यक्त होत आहे.
वाळू उपसामध्ये राजकीय लोकप्रतिनिधीही गुंतले
काही राजकीय लोकप्रतिनिधीच या बेकायदेशीर वाळू उपसामध्ये गुंतले आहेत. पैसे कमावण्याच्या आशेने मोठ्या प्रमाणात रात्रीच्यावेळी वाळू उपसा केला जात आहे. दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे जलाशय आणि नद्यातील पाणीपातळीत घट होत आहे. या संधीचा फायदा घेऊन वाळू माफिया बेकायदेशीरपणे वाळूची तस्करी करू लागले आहेत. यामध्ये संबंधित विभागाचे अधिकारी, लॉरी चालक यांचादेखील हात असल्याचे सांगितले जात आहे.
विक्रीसाठी बेकायदेशीर तस्करी
नदी परिसरातील माणगाव, हाळे गुडगेनट्टी, चिलभावी, हाळे वंटमुरी, इस्लामपूर, दड्डी बिदरभावी, अत्तिहाळ यासह वन्य प्रदेशात बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे. जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर, टेम्पो आणि टिप्परमध्ये वाळू भरली जात आहे. विक्रीसाठी बेकायदेशीर तस्करी केली जात आहे. रात्रीच्यावेळी अवजड टिप्पर वाहनाद्वारे वाळू आणि मातीची वाहतूक केली जात असल्याने रस्त्यांचीही दुर्दशा होऊ लागली आहे. याविरोधात पोलीसही कोणतीच कार्यवाही करत नाही. त्यामुळे वाळूची राजरोसपणे बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे.
बेकायदेशीर वाळू-माती उपसा करणाऱ्यांवर कारवाई
हिडकल जलाशयातील बॅकवॉटर परिसरात आणि वनक्षेत्रात वाळू आणि मातीची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार आणि पोलिसांबरोबर याबाबत चौकशी करून अहवाल दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
– सुमित्रा एस. (उपनिर्देशक खाण आणि भूविज्ञान विभाग, बेळगाव)









