सीमावाद चर्चेने सोडविणार, नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांचा भारत दौरा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांच्या भारत दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये ‘रामायण सर्किट’ करार करण्यात आला आहे. त्यानुसार भारत आणि नेपाळमधील रामायण आणि प्रभू रामचंद्रांशी संबंधित स्थाने आणि तीर्थस्थळे एकमेकांशी महामार्गांनी जोडली जाणार आहेत. यामुळे भक्तीपर्यटनाला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. याशिवाय दोन्ही देशांमध्ये अनेक करार करण्यात आले. नेपाळचे पंतप्रधान दहल यांचे बुधवारी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात आगमन झाले. त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. गुरुवारी दुपारी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाली. दोन्ही देशांमधील संबंध दृढतर करण्याची योजना असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांमधील सीमावाद चर्चेच्या माध्यमातून सोडविला जाईल, असे प्रतिपादन दहल यांनी केले.
‘हिट’ पासून सुपटहिट
2014 मध्ये आपल्या पहिल्या नेपाळ दौऱ्यात मी नेपाळला हाय वे, ई वे आणि ट्रान्स वे असे ‘हिट’ या सूत्राचा प्रस्ताव दिला होता. आता दोन्ही देशांमधील संबंध हिट पासून सुपरहिट पातळीवर नेण्याचा निर्धार आम्ही केला आहे. दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कोणाचाही अडथळा राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. नेपाळच्या जनतेसाठी नवे रेल्वेमार्ग भारत तयार करणार आहे. तसेच त्या देशातील रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.
भारताचा वेगाने विकास
पंतप्रधान मोदींच्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर भारताने वेगवान आर्थिक विकास केला आहे. 9 वर्षे पूर्ण केल्यासाठी मी त्यांच्या सरकारचे अभिनंदन करतो. भारत आणि नेपाळ यांच्यात अनेक करार करण्यात आले असून आगामी काळात दोन्ही देश एकमेकांच्या अधिक जवळ येतील. माझा नेपाळचे पंतप्रधान या नात्याने हा चौथा भारत दौरा आहे, असे प्रतिपादन दहल यांनी केले.
गांधी समाधीचे दर्शन
दहल यांनी गुरुवारी सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले. नंतर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याशी चर्चा केली. शुक्रवारी ते इंदूर येथे जाऊन महाकालेश्वर मंदिराला भेट देणार आहेत. त्यानंतर ते नेपाळला परत जाणार आहेत.
रोटी-बेटी संबंध बळकट होणार
नेपाळ आणि भारत यांच्यातील रोटी-बेटी संबंध आता अधिक बळकट होणार आहेत. दहल यांच्या भारत दौऱ्याच्या आधी नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडयाल यांनी एका कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. या कायद्यानुसार नेपाळच्या युवकाशी विवाह करुन जी विदेशी महिला नेपाळमध्ये येईल, तिला त्वरित नागरिकत्व दिले जाईल. तसेच नेपाळच्या राजकारणातही तिला प्रवेश करता येईल. यामुळे भारत आणि नेपाळ संबंध अधिक दृढ होणार आहेत. कारण उत्तर प्रदेश आणि बिहार येथील अनेक भारतीय युवतींचे विवाह नेपाळच्या युवकांशी झालेले आहेत. तसेच तेथील युवतींचे विवाह भारतीय युवकांशी झाले आहेत. त्यांचा या कायद्यामुळे लाभ होणार आहे. तथापि, यामुळे चीन संतप्त होण्याची शक्यता आहे. कारण, तिबेटशीही नेपाळचे रोटी-बेटी संबंध आहेत. चीनविरोधी तिबेटी नागरिक या कायद्यामुळे नेपाळमध्ये अधिक प्रमाणात प्रवेश करतील आणि चीनविरोधी कारवाया नेपाळमधून सुरु ठेवतील, अशी चिंता चीनला भेडसावीत आहे.
विविध विषयांवर करार
गुरुवारी दोन्ही देशांमध्ये विविध करार करण्यात आले. त्यांच्यात वीज निर्मिती, खत पुरवठा, महामार्ग निर्मिती, रेल्वे लाईन निर्माण कार्य, शिक्षण तांत्रिक प्रशिक्षण, सांस्कृतिक आदानप्रदान अशा अनेक करारांचा समावेश आहे.









