नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मानहानी प्रकरणात 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर काँगेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली आहे. तसेच त्यांना आता खासदार म्हणून मिळणाऱया सोयी-सुविधांवरही पाणी सोडावे लागणार आहे. खासदारांना मिळणारे सरकारी निवासस्थान सोडा अशी नोटीस त्यांना आली आहे. त्यांनी निवासस्थान सोडण्याची तयारी केली असून तसे उत्तर पाठविले आहे.
22 एप्रिल पर्यंत सरकारी निवासस्थान सोडावे, अशी नोटीस राहुल गांधी यांना देण्यात आलेली आहे. ही नोटीस लोकसभेच्या सचिवालयाने पाठविली आहे. गांधी यांनी या नोटीसीला उत्तर पाठविले असून दिलेल्या कालावधीत निवासस्थान सोडू असे स्पष्ट केले आहे. माझ्या अधिकारांना कोणतीही बाधा पोहचू न देता मी, नोटीसीत स्पष्ट केल्याप्रमाणे कृती करणार आहे. नियमाप्रमाणे लोकसभा सदस्यत्व गमावल्याच्या दिवसापासून एक महिन्याच्या आत सरकारी निवासस्थान सोडावे लागते, असे एका अधिकाऱयाने स्पष्ट केले. राहुल गांधीनाही या नियमाचे पालन करावे लागणार आहे, असे लोकसभा सचिवालयाने स्पष्ट केले आहे.
माझे घर घ्या
सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर राहुल गांधी एकतर त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्या सरकारी निवासस्थानी रहावयास जातील, किंवा मी माझे सरकारी निवासस्थान त्यांच्यासाठी सोडण्यास तयार आहे, असे काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्ल्कार्जुन खर्गे यांनी सांगितले आहे. ते लवकरच गांधी यांची भेट घेणार आहेत.
न्यायालयाचा निर्णय
2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी कर्नाटकातील कोलार येथे केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे नियमानुसार गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व तत्काळ गमवावे लागले आहे. सुरतच्या न्यायालयाने गांधी यांना 30 दिवसांचा जामीन, उच्च न्यायालयात अपील करता येणे सोयीचे व्हावे, यासाठी संमत केला आहे. मात्र, अद्याप गांधी यांनी अपील केलेले नाही.









