वृत्तसंस्था/ मुंबई
विश्वचषकाच्या अंतिम लढतीत के. एल. राहुल ‘जिंकू किंवा मरू’ या मानसिकतेने खेळला नाही. कारण त्याला भारतीय संघाच्या तळाकडच्या फलदाजांवर भार टाकायचा नव्हता. भारताच्या अंतिम फेरीतील पराभवाच्या सर्वांत मोठ्या कारणांपैकी हे एक आहे, असे मत पाकिस्तानचा माजी खेळाडू वसिम अक्रमने व्यक्त केले आहे.
त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 240 धावा केल्या होत्या आणि त्यात राहुलने 107 चेंडूंत 66 धावा केल्या होत्या. कोणतेही एक विशेष कारण निवडायचे झाल्यास मला वाटते की, मधल्या फळीने ‘जिंकू किंवा मरू’ या मानसिकतेने खेळायला हवे होते, असे अक्रमने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले. ‘राहुलच्या मनात त्यावेळी काय चालले होते ते मी समजू शकतो. जडेजानंतर भक्कम फलंदाज नसल्याने आपल्या टिकून राहून फलंदाजी करायची आहे हे त्याच्या मनात होते आणि टिकून राहून फलंदाजी म्हणजे तो बाद होण्याचा धोका पत्करू शकत नव्हता, असे अक्रम पुढे म्हणाला.
अंतिम सामन्यात संघाला अष्टपैलू हार्दिक पंड्याची अनुपस्थिती नेहमीपेक्षा जास्त जाणवली. कारण तो त्याच्या पॉवर हिटिंगच्या जोरावर मधल्या फळीला संतुलन प्राप्त करून देतो, याकडे अक्रमने लक्ष वेधले. ‘हार्दिक संघात असता, तर कदाचित राहुलने धोका पत्करला असता. पण जर या परिस्थितीत तो धोका पत्करून बाद झाला असता, तर लोकांनी त्याच्यावरही टीका केली असती, असे अक्रम म्हणाला. 20 ते 40 या षटकांमध्ये झटपट धावा न जमविणे निश्चितच भारताला महाग पडल्याचे मत त्याने व्यक्त केले. ‘जर त्यांनी वेग राखला असता आणि मधल्या षटकांमध्ये झटपट धावा जमविल्या असत्या, तर चित्र वेगळे दिसले असते’, असे अक्रमने सांगितले.
कर्णधार रोहित शर्मा अंतिम सामन्यात ज्या प्रकारे आक्रमक दृष्टिकोन बाळगून पुढे गेला त्याचे अक्रमने समर्थन केले आहे. कारण त्यामुळेच तो संपूर्ण स्पर्धेत यशस्वी ठरला, याकडे त्याने लक्ष वेधले आहे. ‘तो संपूर्ण विश्वचषकात असाच खेळला. ही त्याची खेळण्याची पद्धत आहे. त्याने जी सुरुवात प्राप्त करून दिली किंवा ज्या प्रकारे तो चाळिशी ओलांडल्यानंतर सतत बाद होत राहिला त्याबद्दल संपूर्ण विश्वचषकात कुणीही तक्रार केली नाही. त्याने अंतिम फेरीतही तेच केले. लोकांना तक्रारी करण्यासाठी फक्त कारण हवे. जरी रोहित त्या सामन्यात मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला असला, तरी तो फिरकी गोलंदाजी चांगल्या प्रकारे खेळू शकणाऱ्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तो बाद झाला त्याचे श्रेय मॅक्सवेल आणि कमिन्स यांना जाते. पण रोहितच्या खेळाची ती शैली आहे आणि त्याने त्यात बदल करावा असे मला वाटत नाही, असे अक्रम म्हणाला.









