सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कामाला गती : ड्रोनच्या साहाय्याने एरियल सर्वेक्षण
प्रतिनिधी/ बेळगाव
नियोजित नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. शनिवारी ड्रोनच्या साहाय्याने एरियल सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हुबळी येथील कंपनीकडून एरियल सर्वेक्षण करण्यात आले.
नियोजित नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहामजली इमारतीकरिता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 100 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वेगवेगळ्या टप्प्यात आवश्यक असणारी कामे पूर्ण करून घेतली जात आहेत. यामध्ये माती परीक्षण यापूर्वीच करण्यात आले आहे. तर इमारत उभी करण्यासाठी जागेचा दर्जा तपासणीचे काम 15 दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी परिसरातील जवळपास दोन एकर जागा संपादित करण्यात येणार आहे. यासाठी सहा ठिकाणी बोअरवेल मशीनच्या साहाय्याने दर्जा तपासणी करण्यात आली आहे. सदर जागेवर किती मजली इमारत उभी केली जावू शकते, याची तपासणी करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाची नियोजित इमारत 145 मीटर लांब व 71 मीटर रुंद असणार आहे. यामध्ये दोन मजली बेसमेंट तर 4 मजली कार्यालय अशी एकूण सहामजली इमारत उभारली जाणार आहे. यासाठी बांधकाम खात्याकडून जमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर शनिवारी ड्रोनच्या साहाय्याने एरियल सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण झाले आहे.









