एकच ठिकाणी सुविधा : लाभार्थ्यांची गैरसोय
बेळगाव : आधारकार्ड दुरुस्तीची प्रक्रिया केवळ एकच ठिकाणी सुरू असल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. लाभार्थ्यांना दुरुस्तीसाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत. बेळगाव वन, ग्रामवनमध्ये आधारकार्ड दुरुस्तीचे काम ठप्प आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तात्पुरत्या स्वरुपात सुरू असलेल्या केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे. जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून लाभार्थी आधारकार्ड दुरुस्तीसाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे काहींना दुरुस्तीविना माघारी जावे लागत आहे. अनेकांच्या आधारकार्डमध्ये दुरुस्ती असल्याने कामात अडचणी येऊ लागल्या आहेत.
कर्नाटक वन, बेळगाव वन आणि ग्रामवनमध्ये देखील आधारकार्ड दुरुस्तीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. केवळ एकाच ठिकाणी आधारकार्ड दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे या केंद्रावर अतिरिक्त ताण वाढू लागला आहे. परिणामी लाभार्थ्यांना दिवसभर रांगेत थांबण्याची वेळ आली आहे. आधारकार्डमध्ये नावात बदल, पत्त्यात बदल, मोबाईलनंबर आणि इतर दुरुस्ती केली जात आहे. मात्र कर्नाटक वनमध्ये हे काम बंद केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचा गोंधळ उडू लागला आहे. आधारकार्ड दुरुस्तीचे काम कर्नाटक वन, बेळगाव वन आणि ग्रामवन केंद्रावर सुरळीत सुरू ठेवावे, अशी मागणीही होत आहे.
काही खासगी ऑनलाईन सेंटरवर जादा पैसे घेऊन दुरुस्ती
काकतीवेस येथील काही खासगी ऑनलाईन सेंटरवर जादा पैसे घेऊन दुरुस्ती केली जात असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. एका आधारकार्ड दुरुस्तीसाठी 800 ते 1000 रुपयांची मागणी करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसू लागला आहे.









