बेळगाव विमानतळाला उत्तम प्रतिसाद : विमानफेऱ्या वाढविण्याची मागणी
बेळगाव : बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 2024 मध्ये तब्बल 3 लाख 47 हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आल्याने बेळगावचे महत्त्व पुन्हा एकदा वाढले आहे. विमानफेऱ्या कमी असतानाही प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने आता केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाला विमानफेऱ्या वाढविण्याचा विचार करावा लागेल. डिसेंबर महिन्यात 29 हजार 80 प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत 19 टक्के प्रवासी वाढले आहेत. बेळगाव-बेंगळूर या सकाळच्या विमानफेरीमुळे प्रवासी संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी हे कामानिमित्त बेळगावला ये-जा करीत असल्याने विमानाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या इंडिगो व स्टार एअर या दोनच कंपन्या देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा देत आहेत.
27 मेट्रिक टन कार्गो वाहतूक
केवळ प्रवासीच नाही तर आता बेळगावमधून कार्गो वाहतूकही सुरू आहे. मोठ्या विमानांमधून कार्गो वाहतूक केली जात आहे. बेळगावमधून अनेक मौल्यवान वस्तू, पार्सल, पत्र तसेच औद्योगिक कारखान्यांमधील स्पेअरपार्ट यांची वाहतूक विमानाने केली जात आहे. मागील वर्षात 27.3 मेट्रिक टन कार्गो वाहतूक झाली आहे. त्यामुळे कार्गो वाहतुकीसाठी बेळगाव विमानतळ भविष्यात महत्त्वाचे ठरणार आहे. डिसेंबर 2024 मध्ये 442 विमानांची ये-जा होती. यामध्ये कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, काँग्रेस अधिवेशन यामुळे विमानांची वाहतूक वाढली. संपूर्ण वर्षात 5 हजार 591 विमानांनी बेळगावमध्ये ये-जा केली आहे. सध्या बेंगळूर, दिल्ली, हैद्राबाद या शहरांना इंडिगो एअरलाईन्स तर अहमदाबाद, मुंबई, नागपूर, जयपूर व तिरुपती या शहरांना स्टार एअर सेवा देत आहे.









