दुहेरी सुरक्षेमुळे समस्या उद्भवणार असल्याचा दावा
वृत्तसंस्था /चंदीगड
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्र सरकारकडून पुरविण्यात येणारी झेड प्लस सुरक्षा स्वीकारण्यास नकार दिला आहे. अमृतपाल सिंह प्रकरणानंतर निर्माण झालेली स्थिती पाहता केंद्र सरकारने मागील आठवड्यात झेड प्लस सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री मान यांच्या सुरक्षा पथकाने गुरुवारी केंद्र सरकारला पत्र लिहून स्वत:ची भूमिका कळविली आहे. पंजाब आणि दिल्लीत मला झेड प्लस सुरक्षेची गरज नाही. माझ्यासाठी पंजाब पोलीस आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठीचे विशेष पथकच पुरेसे आहे. पंजाब आणि दिल्लीमध्ये 2-2 सुरक्षा चक्र असल्याने समस्या उद्भवू शकते असे मत सुरक्षा पथकाने व्यक्त केल्याचे मुख्यमंत्री मान यांनी सांगितले आहे. 25 मे रोजी केंद्र सरकारने पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय व्हीव्हीआयपी सुरक्षेशी संबंधित गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाच्या आधारावर घेतला होता. झेड प्लस सुरक्षेत 55 कमांडो असतात. यात 10 एनएसजी कमांडोंचाही समावेश असतो. उर्वरित बहुतांश कमांडो हे सीआरपीएफचे असतात. पंजाबमध्ये खलिस्तान समर्थक अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. तर मागील काही काळात अमृतसर येथील सुवर्णमंदिरानजीक बॉम्बस्फोट आणि देशविदेशात सुरू असलेल्या निदर्शनांनंतर गुप्तचर यंत्रणांना काही इनपूट्स प्राप्त झाले आहेत. खलिस्तान समर्थकांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेमुळे मान यांना धोका असल्याचे सांगण्यात आले होते.









