विनायक भोसले/ कोल्हापूर
चेतेश्वर पुजारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकला, तेव्हापासून त्याला ओळख मिळाली प्रतिद्रविड. कारण द्रविड सारखाच डिफेन्स, त्याच्यासारखंच एकदा खेळपट्टीवर उभं राहिल की टिच्चून खेळायचं, स्वभावही शांत आणि जे काय राडे आहेत ते फक्त बॅटिंगमध्ये असे सगळे गुण पुजारामध्ये आहेत.
2020-21 मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, कांगारु बॉलर्सचे बाऊन्सर्स अंगावर खात, पुजारा क्रीझवर ठाण मांडून उभा राहिला आणि भारताने फक्त मॅचच नाही तर सिरीज जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला. पुजारा साऱ्या देशाचा हिरो बनला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्याचा फॉर्म गंडला. तो क्रीझवर थांबून 100-200 बॉल किरकोळीत खेळायचा, पण रन्स व्हायचे 30-35. फिफ्टीचा आकडा कधीतरीच लागायचा. त्याच्या शांतीत क्रांती बॅटिंगचं कौतुक करणारेही आता त्याच्यावर टीका करु लागले. यानंतर पुढील काळात त्याला काही वेळा संघात स्थान मिळाले तर काही वेळा संघाबाहेर बसावे लागले. पण स्वभावाने शांत असलेल्या पुजाराने याबाबत मात्र कधीच वाच्यता केली नाही.
संपूर्ण देशात सध्या आयपीएलचा माहोल जोरात आहे. जगभरातील नामांकित क्रिकेटपटू, युवा खेळाडू आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघाकडून खेळत आहेत. अशावेळी पुजारा मात्र कुठेच नाही. यामुळे पुजारा कुठे गेला, काय करतो हे काय फार बातम्यामध्ये येत नव्हतं. पण नेहमीप्रमाणं पुजाराची बॅट बोलायला लागली. तर ती कौंटी क्रिकेटमध्ये. विशेष म्हणजे, या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झालेले कित्येक दिग्गज येथे बॅटिंग करत असतात. पुजाराही गेल्या काही वर्षांपासून कौंटी क्रिकेट खेळतोय, इंग्लिश कंडिशन्समध्ये खेळण्याचा, स्विंग बॉलिंगला सामोरे जाण्याचा अनुभव घेण्यासाठी कौंटी क्रिकेट फायद्याचे असते. सोबतच इंग्लंडमधल्या वातावरणात रन्स झाले, की तुम्हाला कॉन्फिडन्स पण मिळत असतो, हे वेगळचे असते.
यावर्षी तो खेळतोय, ससेक्स कौंटी संघाकडून. ससेक्ससाठी त्याने चार सामन्यांमध्ये तिसरे शतक झळकावले आहे. पुजाराने ससेक्सकडून खेळताना वर्सेस्टरशायरविरुद्ध पहिल्या डावात 189 चेंडूत 136 धावा केल्या. याशिवाय डरहॅमविरुद्ध त्याने 115 धावा केल्या. तसेच ग्लॉस्टरशायरविरुद्ध सामन्यात 238 चेंडूंत 151 धावा फटकावल्या. या शतकासह पुजाराचे नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदले गेले. त्याने फर्स्ट क्लासमध्ये 57 शतके झळकावणाऱ्या वसीम जाफरचा विक्रम मोडला. प्रथम श्रेणीतील सर्वाधिक शतके करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. त्याने 58 फर्स्ट क्लास शतके नोंदवली आहेत. या यादीत पुजाराच्या वर सचिन तेंडुलकर (81 शतके), सुनील गावस्कर (81 शतके), राहुल द्रविड (68 शतके) आणि विजय हजारे (60 शतके) आहेत. विशेष म्हणजे, पुजाराचा फॉर्म गेल्यावर त्याला बाहेर बसवा म्हणणारे आज त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
पुजाराला सूर गवसला महत्वाचे
पुजाराचे इंग्लंडमध्ये धावा करणे ही टीम इंडियासाठी चांगली बातमी आहे, कारण भारताला तिथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. एकीकडे आयपीएलमध्ये तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाले असताना पुजाराची कौंटीमधील खेळी महत्वपूर्ण मानली जात आहे. अर्थात, एवढं भारी खेळून पुजारा संघातील सिलेक्शन, फॉर्म याबद्दल एकही शब्द बोलला नाही, फक्त यंदाच्या कौंटी क्रिकेटमध्ये शब्दांपेक्षा त्याची बॅट जास्त बोलली. आयपीएलमध्ये भलेही त्याला कोणत्याही संघाने घेतले नाही, कौंटीमध्ये मात्र त्याने दमदार खेळी साकारत लक्ष वेधून घेतले आहे. अर्थात, पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पुजाराचा हा कौंटीमधील अनुभव कामी येईल यात शंकाच नाही.









