कॉन्स्टेबलच्या हत्येतील दोन आरोपी चकमकीत ठार
वृत्तसंस्था/ जालौन
उत्तर प्रदेशात आणखी एक मोठी चकमक झाली आहे. जालौन पोलिसांनी रविवारी एकाचवेळी कल्लू उर्फ उमेश आणि रमेश या दोन हल्लेखोरांना ठार केले. हे दोघेही आरोपी 10 मे रोजी कॉन्स्टेबल भेदजीतच्या हत्येप्रकरणी वॉन्टेड होते.
कर्तव्यावर असताना कॉन्स्टेबल भेदजीत यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील संशयित कारखाना परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी विशेष पथकांच्या सहाय्याने पोलिसांनी सापळा रचला. याचदरम्यान संशयितांनी पोलिसांवर गोळीबार केल्याने चकमक झाली. याचदरम्यान जालौनमध्ये रविवारी दुपारी पोलिसांनी दोघांना ठार केले. ओराई येथील कारखाना परिसरात झालेल्या या चकमकीत एका पोलीस निरीक्षकालाही गोळ्या लागल्या. मात्र, सुदैवाने अन्य कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल दोन्ही हल्लेखोर जखमी झाले. चकमकीनंतर पोलिसांनी या हल्लेखोरांना ओराई ऊग्णालयात नेले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. झडती घेतली असता गुन्हेगारांच्या ताब्यातून अनेक अवैध पिस्तूल, देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली.
बुलेटप्रूफ जॅकेटमुळे वाचले प्राण
हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात पोलीस पथकातील अधिकारी थोडक्यात बचावले. बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केलेले असल्यामुळे त्यांना गोळी लागली नाही. चकमकीदरम्यान, ठाणे कोतवाली ओरईचे प्रभारी निरीक्षक शिवकुमार राठोड यांच्या डाव्या हाताला गोळी लागल्याने ते जखमी झाले.









