अध्याय सत्ताविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, निष्काम भाविकांच्या भक्तीने मी सुखावतो. निष्काम भाव धरून भगवद्भक्ती केली असता आपण खरोखरच कृतकृत्य होतो अशी ज्याची खात्री असेल, त्याच्या उदकानेही मी तृप्त होतो. जो ढोंगी भक्त असतो, तो पोटात द्रव्याची आशा आणि बाहेर विरक्ती मिरवत असतो. लोकांमध्ये प्रतिष्ठा वाढण्यापुरतीच माझी भक्ती करतो. अशा अभक्ताने छत्र, चामर किंवा गजान्तलक्ष्मीही अर्पण केली तरी माझ्या चित्तात सुखाचा लेशही उपजत नाही. अभक्तांच्या भजनपूजनाने मी हृषीकेश कधीच संतोष पावत नाही. याप्रमाणे भक्त आणि अभक्त यांचे पूजा करण्याचे प्रकार व त्यांच्या अधिकारांचे विभाग भगवंतानी उद्धवाला दाखवून दिले. आता येथून पुढे सुरवातीपासून शेवटपर्यंत पूजा कशी करावी ते श्रीकृष्ण सांगणार आहेत. ते म्हणाले, उपासकाने आधी पूजेची सामग्री एकत्रित करून ठेवावी. नंतर पूर्वेकडे टोक असलेले कुशासन अंथरून, पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून त्यावर बसावे. मूर्ती स्थिर असेल तर तिच्यासमोर बसावे. नंतर पूजा करावी. आता ह्याबद्दल मी तुला सविस्तर सांगतो. शरीरशुद्धीचे स्नान झाल्यानंतर वैदिक तांत्रिक मंत्रस्नान करावे व नित्यविधी उरकावा, याचे नाव ‘शुचिर्भूतपणा’. नंतर देवपूजेचे साहित्य यथासांग गोळा करून पवित्र करावे आणि मग गंधादिक पूजेची सामग्री जिथल्या तिथे ठेवावी. सामग्री जिथल्या तिथे ठेवली की, हवी तेव्हा ती मिळत जाते. पांढरी कांबळ, मृगचर्म आणि पूर्वाभिमुख दर्भाग्र आसन घालून त्यावर पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावे. स्थावर मूर्तीची पूजा करताना आपले आसन मूर्तीच्या समोर घालावे. हा निर्दोष आसनविधी होय. आता पूजान्यासादिक विधीबद्दल सांगतो. विधीयुक्त आसन घालून गुरूला नमस्कार करावा. परमगुरु (गुरुचा गुरु) व परमेष्ठीगुरु (परमगुरूचा गुरु) यांनाही अत्यंत प्रेमाने अभिवंदन करावे. जो मंत्र गुरूकडून मिळाला असेल त्या मंत्राचे देहावर न्यास करावेत आणि मंत्रमूर्ती ध्यानात आणून मानसपूजा करावी. जी मूर्ती ध्यानात आणली असेल तीच प्रतिमेत आणण्यासाठी प्रतिमेला हातात धरून तिच्या अंगावरही न्यास करावेत.
कलश आणि प्रोक्षणपात्र (पंचपात्र इ.) योग्य ठिकाणी ठेवून, ती पाण्याने भरून, त्यांत दूर्वा, गंध, इत्यादि पूजाद्रव्ये घालावीत. त्या प्रोक्षणपात्रातील जलात बोटांची नखे न बुडविता सारी पूजासामग्री त्या जलाने फक्त दर्भांच्या शेंड्याने प्रोक्षण करावी. त्यानेच देवघरही प्रोक्षण करावे स्वत:ला प्रोक्षण करून घ्यावे व देवपूजेची जागा (देव्हारा वगैरे ) प्रोक्षण करून पूजेला आरंभ करावा. पाद्य, अर्ध्य, आणि आचमनीय ह्याकरिता तीन पात्रे मांडावीत व त्यात पाणी भरून त्या तिन्ही पात्रात भिन्न भिन्न पदार्थ घालावेत. सावे, दूर्वा, कमळ व विष्णुक्रांत ही पाद्यपात्रातील शुद्ध द्रव्ये होत. गंध, फूल, फल, अक्षता व दर्भाग्रे ही अर्ध्य पात्रात घालण्याची शुद्ध द्रव्ये होत. वेलदोडे, वाळा, जायफळ, लवंग, कापूर व कंकोळ हे ‘आचमनीय’ पात्रात घालण्याचे शुद्ध पदार्थ होत. गुरुमंत्राची दीक्षा असेल, तोच मार्ग शिष्याने धरून गुरुसंप्रदायाप्रमाणे, तिन्ही पात्रे मांडावीत. ही तिन्ही पात्रे आपण गायत्रीमंत्राने अभिमंत्रण करून देवाला अर्पण करावीत. आगमशास्त्राचा निजमार्ग, भूतशुद्धी आणि प्राणप्रतिष्ठेचा योग, यासंबंधाने श्रीकृष्ण पुढे सर्व काही सांगत आहेत. ते म्हणाले, प्रथम प्राणायामाबद्दल सांगतो. वायुबीजाचे आवाहन करून पिंगलानाडीने प्राण पूर्ण करावा. त्यासाठी उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्यावा. आत घेतलेला श्वास कुंभकाने तो थांबवून मात्राधारणेने धरावा. मात्राधारणा म्हणजे काय ते सांगतो. पूरक चार मात्रांनी केला तर कुंभक 16 मात्रांनी व रेचक 8 मात्रांनी करावा. कोंडून ठेवलेल्या वायूवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्या प्रयत्नात तो भलत्याच मार्गाने बाहेर जाणार नाही तोपर्यंतच थांबवून धरावा आणि मग हळूहळू बाहेर सोडावा. असा प्राणायाम करीत असता आपले शरीर क्षीण झाले आहे अशी आपणच कल्पना करावी.
क्रमश:








