जिल्हा पंचायतीचा आदेश, विश्रांतीसाठी मंडप उभारणी
बेळगाव : रोहयोअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची विशेष काळजी घेतली जात आहे. वाढत्या उन्हात मजुरांना विश्रांतीसाठी मंडप घातला जात आहे. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी पाणी, प्रथमोपचार पेटी आणि पाण्याची बाटली दिली जात आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात रोहयो मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. अकुशल कामगारांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या रोहयोअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाढत्या उन्हात मजुरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांना भेट देऊन रोहयो कामगारांना आरोग्याबाबत सूचना केल्या आहेत. शिवाय अधिकाऱ्यांना रोहयोंना प्राथमिक सुविधा पुरविण्याचेही आदेश दिले आहेत.
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळे शरीराची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत काम करताना रोहयो मजुरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे प्रशासनाने रोहयो मजुरांसाठी विविध उपाययोजना हाती घेतले आहेत. प्राथमिक सुविधाबरोबर विश्रांतीसाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्याठिकाणी झाडे किंवा इतर सावली उपलब्ध नसल्यास संबंधित ग्राम पंचायतींना सावलीची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषत: वाढत्या उन्हामुळे रोहयोच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. सकाळी 8 ते 1 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्याबरोबर पाणी, जेवण आणि विश्रांतीसाठी कामाच्या ठिकाणी सावलीची व्यवस्था केली जात आहे. काही ग्राम पंचायतीने एखाद्या कार्यक्रमाप्रमाणे किंवा लग्न कार्याप्रमाणे मंडपची उभारणी केली आहे. त्यामुळे रोहयो मजुरांना या मंडपात विश्रांती घेणे सोयीस्कर होऊ लागले आहे.









